उल्हासनगरः साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे. पालिकेने वय वर्षे १५ ते ३६ या गटातील निरक्षरांना पायाभूत सारक्षता, संख्याज्ञान, जीवन कौशल्य विकसीत करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्थांना यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने निरक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.
केंद्र शासनाने २०२२ ते २०२७ या काळासाठी नवभारत साक्षरता योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. नवभारत साक्षरता योजनेसाठी साक्षरतेकडून समृध्दीकडे हे ब्रीदवाक्य घेतले गेले. १५ वर्षे आणि त्याहून अधिक म्हणजे ३५ वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजे वाचन,लेखन, संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मुलभूत शिक्षण देणे. त्या अंतर्गत समतुल्य पूर्व तयारी स्तर अर्थात इयत्ता ३ री ते ५ वी, मध्यस्तर इयत्ता ६ वी ते १० वी आणि माध्यमिक स्तर इयत्ता ९ वी ते १२वी अशा प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण देण्याचे यात अपेक्षित आहे. ज्यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेले विषय यांचा समावेश असेल. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, इयत्ता आठवी पूर्ण झालेले विद्यार्थी, शिक्षकसेवक, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्था आणि गट सहभागी होऊ शकतील. यात स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने काम करणे अपेक्षित असून त्यासाठी त्यांना त्यांच्या सेवांसाठी कोणतेही वेतन किंवा मानधन दिले जाणार नाही. त्यामुळे सेवाभावी वृत्तीने काम करण्यासाठी आणि निरक्षरांना साक्षर करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.
हेही वाचा >>>भाईंदर : सुट्टी न दिल्यामुळे संतप्त तरुणीचे कृत्य, चक्क डीमार्टमध्ये लावली आग
हेही वाचा >>>आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले…
शाळा, महाविद्यालयातील शिक्षक शाळा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर एक तास निरक्षर विद्यार्थ्यांना शिकवू शकतील. महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच नेहरू युवा केंद्र संघटन यांनादेखील यात सहभाग घेता येईल. जिल्हा प्रशासनाने उल्हासनगर महानगरपालिकेसाठी २०२३-२४ या वर्षासाठी २ हजार ३० विद्यार्थ्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे योगेश मराठे यांनी दिली आहे.