डोंबिवली – उलवे येथील नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच या विमानतळाला ज्येष्ठ शेतकरी नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल. यासंदर्भातच्या जोरदार हालचाली केंद्र शासन स्तरावर सुरू आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची नस्ती पंतप्रधान कार्यालयाकडे अंतीम मंजुरीसाठी गेली आहे. त्यामुळे या विमानतळ नामकरणासंदर्भातची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माजी खासदार डाॅ. संजीव गणेश नाईक यांनी शुकवारी डोंबिवलीत प्रगती महाविद्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत दिली.

नवी मुंबई विमानतळाला शेतकरी नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या विषयावरून स्थापन झालेल्या सर्व पक्षीय कृती समितीची बैठक शुक्रवारी येथे पार पडली. या बैठकीला कृती समितीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकुर, दशरथ पाटील, माजी मंत्री कपील पाटील, माजी खासदार डाॅ. संजीव नाईक, आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष केणे, संयोजक नितीन पाटील आणि कृती समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. यासंदर्भातच्या सर्व शासकीय कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवायचा, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीत डाॅ. संजीव नाईक यांनी सांगितले, गेल्या आठवड्यात आम्ही दिल्ली येथे गेलो होतो. त्यावेळी आम्ही विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय कुठपर्यंत मंजुरीसाठी आला आहे अशी आठवण करून दिली. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे यांचे नाव देण्याची नामकरणाची नस्ती अंतीम मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे गेली आहे. यासंदर्भातच्या अंतीम मंजुरीच्या प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन यासंदर्भातची घोषणा केली जाईल, असे आश्वास्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या सर्व पक्षीय कृती समितीच्या आपल्या ऐतिहासिक लढ्याला यश आले आहे. या यशाचे आपण सर्व साक्षीदार असणार आहोत. या विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेले असेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीत या लढ्यात समर्पित भावाने सहभागी झालेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा लढवय्ये म्हणून सन्मान करण्यात आला.

या बैठकीत माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, कृती समिती कोषाध्यक्ष डी. तांडेल, सरचिटणीस दीपक म्हात्रे, अतुल पाटील, गायक जगदीश पाटील, शरद म्हात्रे, दीपक पाटील आणि रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.