ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपामधील दुभंग अटळ आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे करणार असल्याचे समजते. मंगळ दुपारी या पक्षप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबईतील स्थानिक राजकारणावर गणेश नाईक यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. नवी मुंबईत भाजपमधील स्थानिक प्रभावी नेत्यांपैकी ९० टक्के पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक नाईकांचे कडवे समर्थक आहेत. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रांत पक्षाचे ४५ पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे नाईक यांच्या गोटातील मानले जातात. शहरातील सर्व धर्मीय तसेच जाती, पंथाच्या नागरिकांमध्ये गणेश नाईक यांचा स्वत:चा असा प्रभाव राहिला आहे. गणेश नाईक हे राष्ट्रवादी पक्षात होते. त्यावेळी पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. यानंतर राज्यातही भाजपला सत्ता मिळाली. हा काळ मोदी यांच्या वाढत्या प्रभावाचा होता. याच काळात अवघ्या वर्षभरात झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकित नाईक यांनी पालिकेत सत्ता मिळवली.
हेही वाचा…बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ..! दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड
२०१२ साली झालेल्या निवडणुकीत बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांचा मंदा म्हात्रे यांनी पराभव केला होता. तर, त्यांचे पुत्र संदीप नाईक हे ऐरोली मतदार संघातून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत नाईक कुटुंबीयांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत गणेश नाईक यांनाच तिकीट देण्यात आले. यामुळे संदीप नाईक यांना तिकीट नाकारले. त्यानंतर राज्यात सत्ता येऊनही नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. तेव्हापासूनच नाईक समर्थक अस्वस्थ होते. त्यातच यंदाच्या निवडणुकीत भाजपाने गणेश नाईक यांना ऐरोली मधून तिकीट जाहीर केली तर, बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना उमेदवारी नाकारत मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे अस्वस्थ झालेले संदीप नाईक यांनी वेगळी चूल मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गणेश नाईक हे भाजपमध्येच राहणार असले तरी संदीप नाईक हे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असलेले संदीप नाईक यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांचा मंगळवारी दुपारी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यामध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.