सिडकोनिर्मित ‘नैना’त जाण्यास ग्रामस्थांचा विरोध
नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवलंबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना पुन्हा एकदा महापालिकेचे वेध लागले आहेत. राज्य सरकारने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात (नैना) या गावांचा समावेश केल्यामुळे पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले असून आता आम्हाला महापालिकाच हवी, अशी अजब मागणी या गावांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात आली.
शिळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण-तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून असलेली ही गावे भौगोलिकदृष्टय़ा नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेवेळी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला. झपाटय़ाने शहरीकरण होत असलेल्या या गावांमध्ये नागरी सुविधांसाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. याचा फायदा भूमाफियांनी घेतला असून गेल्या १०-१२ वर्षांत शिळफाटा ते तळोजा रोडलगत भंगाराची गोदामे, बेकायदा इमारतींचे मोठे जाळे पसरले आहे. एकीकडे गावात अतिक्रमण वाढत असून दुसरीकडे रस्ते, पाणी, वीज या समस्यांनी येथील ग्रामस्थांना ग्रासले आहे. नवी मुंबई महापालिकेने या गावांमध्ये किमान पायाभूत सूविधा पुरविण्याचा प्रयत्न केला होता. इतक्या वर्षांनंतर या सुविधांचे तीनतेरा वाजले असून नियोजनाअभावी ही गावे बकाल झाली आहेत. पालिकेतून वगळण्यात आल्यानंतर या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने ती भकास झाली आहेत.
सिडकोच्या नैना प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजनेमुळे येथील ग्रामस्थांना पुरेसा फायदा मिळणार नाही, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा इशारा
गावात ‘नैना’ प्रकल्पाचे आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे आपल्या जमिनी बाधित होतील, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. त्यास विरोध करण्यासाठी दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शनिवारी दहिसर येथे पार पडलेल्या बैठकीत देण्यात आला आहे.
१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी आहे. – विजय पाटील, दहिसर ग्रामस्थ