कल्याण: नवी मुंबईहून कल्याणकडे येणारी बस बुधवारी सकाळी गर्दीच्या वेळेत वर्दळीच्या पत्रीपुलावर बंद पडली. त्यामुळे पत्रीपुलाच्या दोन्ही बाजुला तुफान वाहन कोंडी झाली. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्ग, शाळकरी मुले आणि माल वाहतूकदार यांना बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमधून नवी मुंबई भागात जाणाऱ्या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. कल्याण, बदलापूर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, आंबिवली परिसरातील नोकरदार नवी मुंबईत जाण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला प्राधान्य देतात. या बसची कल्याण ते नवी मुंंबई धावेची वारंवारिता चांगली असल्याने या बस प्रवासाला प्रवासी प्राधान्य देतात. बुधवारी सकाळी नवी मुंबई परिवहन सेवेची बस कल्याणमध्ये येत असताना, अचानक पत्रीपुलावर बंद पडली. चालकाने बराच प्रयत्न करूनही बस सुरू झाली नाही.

हेही वाचा : ठाणे: देहविक्री करणाऱ्या महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास

या २० मिनिटाचा कालावधीत पत्रीपुलाच्या दोन्ही बाजुला वाहनांचा रांंगा लागल्या. या रांगा गोविंदवाडी वळण रस्ता, डी मार्ट, टाटा नाका परिसरात पोहचल्या होत्या. कोंडी सोडविण्यासाठी बसमागील जड वाहने पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेतून सोडण्यात आली. एका मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावू लागल्याने पुलाच्या दोन्ही बाजुला वाहनांंचा रांंगा लागल्या. या कोंडीत डोंबिवली, ठाकुर्लीतून ९० फुटी रस्त्याने पत्रीपूल दिशेने जाणारी वाहने पुलाच्या अलीकडेच अडकून पडली. शिळफाटा दिशेने येणारी वाहने, कल्याण, भिवंडीकडून शिळफाटा दिशेने जाणारी वाहने अशी तिहेरी कोंडी पत्रीपुलावर सकाळच्या वेळेत झाली. वाहतूक पोलिसांची सकाळच्या वेळेत ही कोंडी सोडविण्यासाठी दमछाक झाली.

हेही वाचा : ठाण्यात परवडणाऱ्या घरांसाठी ठेकेदार मिळेना, पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा; अटी व शर्तींमध्ये बदल

दुचाकीस्वार वाहतुकीचे नियम न पाळता मिळेल तेथून वाट काढत पुढे जात होते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. पुलाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने ती मागून लोटून पुलाच्या किंवा रस्त्याच्या बाजुला घेणेही शक्य नव्हते. चालक, वाहक दोघेही बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. ऐन गर्दीच्या वेळेत ही बस बंद पडल्याने नोकरदार वर्गाने सर्वाधिक संताप व्यक्त केला.लोकलने गेले तर लोकल उशिरा आणि रस्ते मार्गाने गेले तर वाहन कोंडी अशा दुहेरी कोंडीत सध्या कल्याण, डोंबिवली भागातील नोकरदार अडकला आहे. नवी मुंंबई परिवहन कार्यशाळेतील तंत्रज्ञ घटनास्थळी आल्यावर बस दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal transport bus stopped on patri pool leading to traffic jams in kalyan css