कल्याण : कल्याणहून नवी मुंबई दिशेने कल्याण-शिळफाटा रस्त्याने धावत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या एका मिडी बसला बुधवारी रात्री साडे दहा वाजता अचानक कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅल समोर आग लागली. बस मध्ये प्रवासांची संख्या तुरळक असल्याने, चालक, वाहकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी, चालक आणि वाहन यांनी वेळीच बसचा ताबा सोडल्याने मोठी दुर्घटना टळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाची एक मिडी बस बुधवारी रात्री कल्याण मधून प्रवासी घेऊन शिळफाटा रस्त्याने धावत होती. पत्रीपुल ओलांडून बस नेतिवली भागातील मेट्रो माॅल समोर येत असताना चालक, प्रवाशांना बसच्या बोनेट मधून धूर येत असल्याचे दिसले. सुरुवातीला यंत्र गरम झाल्याने हा धूर येत असावा असे चालकाला वाटले. धुराचे प्रमाण वाढताच चालकाने बस बाजुला घेऊन चालक, वाहकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. बस चालक, वाहक, प्रवाशांनी बसचा ताबा सोडताच बसने पेट घेतला. अचानक बस पेटल्याने चालक, वाहक आणि परिसरातील नागरिकांनी लगतच्या घरांमधून बादल्यांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस चारही बाजुने पेटली होती.

हेही वाचा : लवकरच नवी मुंबईकरांना डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

अग्निशमन दलाचे जवान यांना चालकाने ही माहिती तात्काळ दिली. जवान येताच त्यांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. बसला धुमसून पुन्हा आग लागू नये म्हणून बसवर पुन्हा पाण्याचे फवारे मारण्यात आले. रात्री उशिरा नवी मुंबई परिवहनचे देखभाल दुरुस्ती पथक घटनास्थळी आले. त्यांनी बसला बाजुला घेऊन बसला कार्यशाळेत नेण्याचा निर्णय घेतला. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून नवी मुंबई दिशेने पाठविण्यात आले. धूर कशामुळे आला आणि आग भडकण्याचे कारण याचा तपास परिवहन उपक्रमाने सुरू केला आहे.