कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दुर्गाडी किल्ला खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालायत नौदल सामर्थ्याचे दर्शन देण्यासाठी भारतीय नौदलातर्फे टी-८० ही युध्दनौका स्मारक म्हणून जतन करण्यात येणार आहे. मुंबईतील कुलाबा येथील भारतीय नौदलाच्या तळावरुन दोन दिवसांचा प्रवास करुन रविवारी रात्री कल्याणच्या दुर्गाडी किल्ला खाडी किनारी टी-८० युध्दनौकेचे आगमन झाले.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची कल्याण येथे स्थापना केली. महाराजांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून कल्याणच्या खाडी किनारी शिवकाळापासून ते आतापर्यंतच्या आरामाराचे दर्शन देणारे एखादे संग्रहालय असावे म्हणून माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून दुर्गाडी खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडून या प्रकल्पाची आखणी, नियोजन आणि निधी खर्च केला जाणार आहे.
हेही वाचा >>>श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चर्चेत, राष्ट्रवादीचा तीव्र आक्षेप; म्हणे, “डीजींना विनंती आहे की…”!
या आरामाराच्या निमित्ताने भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शक्ती नागरिकांना कळावी म्हणून या संग्रहालयाच्या निमित्ताने युध्दनौकेचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली. नौदल अधिकाऱ्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पालिका आणि नौदल यांच्यात टी-८० ही निवृत्त युध्दनौका संग्रहालयातील एक महत्वपूर्ण भाग म्हणून पालिकेला हस्तांतर करण्याच सामंजस्य करार झाला. गेल्या शुक्रवारी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा, माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी नौदल अधिकारी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी यांच्याकडून कुलाबा येथे नौदल तळावर टी-८० युध्दनौकेचा ताबा घेतला. दोन दिवसाचा प्रवास करुन नौदल अधिकाऱ्यांच्या सारथ्याने युध्द नौका रविवारी रात्री दुर्गाडी खाडी किनारी विसावली.
युध्द नौका खाडी किनारी दाखल होताच सकाळीच कल्याण परिसरातील अनेक नागरिकांनी, सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी नौका पाहण्यासाठी गर्दी केली होती.