ठाणेकर पोलीस कर्मचाऱ्याची लेखन भरारी; ‘नवरा माझा दुसऱ्याचा’ २०जानेवारीला रंगभूमीवर
नोकरीव्यतिरिक्त फावल्या वेळेत आवर्जून जोपासल्या जाणाऱ्या छंदातून त्या व्यक्तीला आनंद मिळतोच, पण त्यात सातत्य आणि गुणवत्ता असेल तर चाकोरीबाहेरच्या जगात डोकाविण्याची चांगली संधीही मिळू शकते. पोलीस दलात वरिष्ठ लिपिक असणारे सुनील पवार यांनी अशाच प्रकारे मिळालेल्या संधीचे सोने करून एक उत्तम लेखक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील सजावटीच्या संहितेपासून त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यातून संधी मिळाल्याने सध्या दूरचित्रवाणीवर लोकप्रिय असलेल्या स्टॅण्डअप कॉमेडीचे लेखक म्हणून नाव कमवत त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक २० जानेवारीला रंगभूमीवर आणत आहेत.
सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुनील पवार एक हरहुन्नरी कलावंत आहेत. ते उत्तम सजावटकार तसेच नकलाकार आहेत. त्यांच्यातील कलागुण हेरून ठाणे आयुक्त कार्यालयाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. गेली दोन दशके ते गणेशोत्सवाची सजावट करतात. अतिशय नावीन्यपूर्ण संकल्पनेमुळे त्यांना आतापर्यंत गणेशोत्सवात विविध स्पर्धामध्ये ९५ पारितोषिके मिळाली आहेत.
सजावटीसाठी ते करीत असलेले संहिता लेखन पाहून त्यांना दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन करण्याची संधी मिळाली. ‘फू बाई फू’ या झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेचे त्यांनी २१ भाग लिहिले. ‘स्टार प्रवाह’वरील ‘ढिंकचिका’ ई टीव्हीवरील (कलर्स) ‘सतराशे साठ सासूबाई’ या मालिकांचे लिखाणही त्यांनी केले.
‘लकी कंपाऊंड’वर आधारित
मराठीतील विविध बोलीभाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे या बोलीभाषांचा वापर करून एखादे नाटक लिहिण्याचे त्यांना अभिनेते दिगंबर नाईक यांनी सुचविले. त्या दृष्टीने त्यांचा विचार सुरू असतानाच मुंब्रा येथील लकी कंपाऊंड दुर्घटना घडली. तेव्हा अनधिकृत इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्य माणसांच्या जिवाशी कसे खेळतात, हे उपहासगर्भ पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न सुनील पवार यांनी त्यांच्या ‘नवरा माझा दुसऱ्याचा’ या दोन अंकी नाटकाद्वारे केला आहे. या नाटकात किशोर चौगुले, मैथली वारंग, सिया पाटील, आशीष आहिरे, परी जाधव आणि रोहित माने हे कलावंत आहेत. मालवणी, बाणकोटी, घाटी, आगरी आदी बोली भाषा सुनील पवार यांनी नाटकात वापरल्या
आहेत.
लकी कंपाऊंड इमारतीची दुर्घटना घडली, तेव्हा मी ठाणे परिमंडळ-१ पोलीस उपायुक्त कार्यालयात होतो. त्यावेळी कामानिमित्त अनेकदा घटनास्थळी जावे लागले. या पडझडीत सर्वसामान्य माणसांची झालेली वाताहात प्रत्यक्ष पाहिली. ते वास्तव उपहासगर्भ विनोदी पद्धतीने नाटकाद्वारे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
-सुनील पवार

Story img Loader