ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोकं ठेवायला भाग पाडून मारहाण केली जात आहे.
जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, असे प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. एनसीसीचे प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे एनसीसीकडून केली जाणारी चांगली कामं लपली गेली आहेत, असंही त्या म्हणाल्या.
ठाण्यात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ:
“प्रशिक्षणादरम्यान घटनास्थळी शिक्षक उपस्थित नसताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी एका समितीची स्थापनाही आम्ही करत आहोत. असे प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांबरोबर असतील तर त्यांनी अजिबात घाबरू नये. आम्हाला येऊन भेटावं. एनसीसी सोडण्याचा अजिबात विचार करु नये,” असेही प्राचार्या नाईक यांनी सांगितलं.