बदलापूर: ज्या शाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाला, त्या शाळेला शिक्षण विभागाने टाळे लावले आहे. मात्र या शाळेच्या अनेक वादग्रस्त बाबी आज बाहेर येत आहेत. या शाळेच्या एकाच इमारतीत तीन शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच शिक्षणाधिकारी यांचे नातलग याच शाळेत शिक्षक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केला आहे. मंगळवारी देशमुख यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्या अंबरनाथ येथील कार्यालयात जात त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत निषेध केला. तसेच शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
बदलापूर शहरात एका शाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. शाळेतील एका शिक्षकानेच हा विनयभंग केला. याप्रकरणी या शिक्षकाला अटक करण्यात आली. या शाळेच्या पाहण्यासाठी आलेल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांच्या तपासणीत ही शाळाच विना परवानगी चालत असल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे फक्त पहिली पर्यंतच्या वर्गांची परवानगी असताना शाळेने दहावीपर्यंत वर्ग सुरू ठेवले होते. या शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीचे अर्ज दुसऱ्याच शाळेतून भरले जात होते. या प्रकारानंतर शाळेला टाळे लावण्यात आले आहे. तर येथील विद्यार्थ्यांना आसपासच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. काही महिन्यांपूर्वी शाळांचे सर्वेक्षण करून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ही शाळा नव्हती हे विशेष.
या शाळेच्या गैर कारभारावर आता संताप व्यक्त होतो आहे. गट शिक्षण अधिकारी या शाळांना अभय देत असल्याचा आरोप करत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देखमुख यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्या खुर्चीला नोटांचा हार घातला. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे याच गट शिक्षण अधिकारी यांचा नातलग याच शाळेत शिक्षक असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. त्यामुळे ही मिलीभगत असल्याचे सांगत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली. याबाबत गटशिक्षण अधिकारी आर. डी. जतकर यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.