ठाणे : शिवसेनेत बंड होऊन महाविकास आघाडीचे सरकार पडल्याच्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीने ‘गद्दार दिन’ साजरा केला. पन्नास खोके असे लिहिलेल्या खोक्याची होळी करत कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांना अटक करून त्यांची सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली: ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी उलटसुलट वक्तव्य, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

गेल्यावर्षी २० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. ‘खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके- पन्नास खोके’, ‘महाराष्ट्र त्रस्त, खोकेवाले मस्त’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्याकडून देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी पन्नास खोके असे लिहिलेल्या खोक्याची होळी केली. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मुंबई-सुरत-गुवाहाटी असा संदेश लिहलेले टी शर्ट परिधान केले होते. या आंदोलनानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आनंद परांजपे यांना अटक करून सोडून दिले.

हेही वाचा >>> कल्याण: उध्दव ठाकरेच पहिले आणि खरे गद्दार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळच्या औलादी- डॉ.जितेंद्र आव्हाड वर्षभरापूर्वी सुर्याजी पिसाळांच्या औलादींनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सुरतेकडे प्रयाण केले होते. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पन्नास खोक्यात स्वतःला विकणाऱ्यांचे चारित्र्य काय असेल, हे सांगायलाच नको. पण, हे पन्नास खोके किती पुरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून धडा शिकवणारच आहे. आता जे काही सर्व्हे येत आहेत. ते सर्व मॅनेज आहेत. शिंदे सरकार आणि भाजपचा गाशा १०० जागांच्या आतच गुंडाळावा लागणार आहे. कारण, गेल्या वर्षभरात महिलांना मारहाण करण्याची संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. रोशनी शिंदे आणि आयोध्या पौळ ही ती उदाहरणे आहेत. अयोध्या पौळला मारणाऱ्या महिला या जयभीम नगरमधल्या नव्हत्या. गेले वर्षभर दादागिरी करणे, खोट्या केसेस टाकणे असेच प्रकार या लोकांनी केले आहेत.  त्यावरून पन्नास खोक्यावाले मनातून किती क्रूर आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp anand paranjape arrest and release for celebrates traitor day in thane zws
Show comments