ठाणे : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून, ढोल ताशाचा गजरात आनंदोत्सव साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनादरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. या मागणीसाठी ठाणे शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालय तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ठाण मांडले होते. दरम्यान, समिती सदस्यांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला. यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा – कळव्यात बेकायदा बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचे प्रोत्साहन ?

कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोल वाजवून, फटाके फोडून आनंद साजरा केला. ‘कहो एक बार फिरसे… शरद पवार दिलसे’, ‘सबंध देशाचा एकच आवाज… शरद पवार , शरद पवार’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – कडोंमपा नगररचना विभागात २३ वर्षे ठाण मांडून बसलेल्या सर्वेअरला आयुक्तांनी हटविले

शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर पिढीतील अंतराचा फरक बाजूला पडला. पवारांचे वय ८३ वर्षे आहे. तरीही विशीतले तरुण आंदोलन करीत होते. पवारांनी राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर सामान्य माणूस हळहळला. म्हणूनच आपण ठामपणे सांगतोय की शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली.