भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे. यांच्याबाबत लोकं योग्यवेळी निर्णय घेतील, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. ते ठाण्यात आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!

यावेळी मोहित कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या विविध आरोपांविषयी विचारलं असता शरद पवार म्हणाले की, रोहित पवारांचं काय होणार? याची भविष्यवाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजपा नेते त्याआधीच असं होणार… तसं होणार… अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, आज यांच्या घरावर धाड पडणार… यांचं अमुक होणार, त्यांचं तमुक होणार… आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar on mohit kamboj allegations on rohit pawar latest update rmm