देशात दिवसेंदिवस महागाई वाढत असून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने मुंब्रा भागात शनिवारी बैल-घोड्यांसह सायकल मोर्चा काढला. महागाई कमी करण्याबरोबरच इंधनाचे वाढलेले दर कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा युवाध्यक्ष अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हा सायकल मोर्चा काढण्यात आला. या सायकल मोर्चामध्ये बैलगाडी, घोडेस्वारही सहभागी झाले होते. हा मोर्चा ठाण्यातील भाजप कार्यालयावर नेण्यात येणार होता. मात्र, अमृतनगर येथून निघालेल्या या मोर्चाला आनंद कोळीवाडा येथे अडवून पोलिसांनी सर्व मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेतले. एकीकडे भाजपचे नेते इंधन दरवाढीला महाविकास आघाडीला जबाबदार धरत आहेत. तर, भाजप शासित राज्यात इंधन ५० रुपयांनी मिळते का असा सवाल करीत, आम्हाला मोदींचे अच्छे दिन नको, आम्हाला आमचे जुने दिवसच हवे आहेत, असे शानू पठाण यांनी यावेळी म्हटले.