कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध विकास प्रकल्प राबवताना आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात ज्या मंजुऱ्या दिल्या गेल्या, त्या सर्व फायलींची चौकशी करण्यासाठी ‘विशेष चौकशी पथकाची’ स्थापना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. ‘एसआयटी’ स्थापन करण्यास शासनाने टाळाटाळ केली तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आगामी पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आव्हाड कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील गैरव्यवहारावरून आयुक्त सोनवणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. आयुक्त पदावरून बदली होऊनही सोनवणे खुर्ची सोडण्यास तयार नव्हते यातच अनेक गोष्टी दिसून येतात. काही राजकीय नेते त्यांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्नशील होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्ताला येथे येण्यापासून रोखण्याचे केविलवाणे प्रयत्न झाले. म्हणजेच महापालिकेत विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होते, अशी टीका आव्हाड यांनी केली.
आयुक्त सोनवणे यांच्या काळात विकास कामांमध्ये सर्वाधिक गैरव्यवहार झाले आहेत. या विषयावर आपण वेळोवेळी आवाज उठवला आहे. रस्ते, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार आहेत. ‘आयएएस’ दर्जाचा आयुक्त पालिकेत आला तर तो हे सगळे गैरव्यवहार बाहेर काढील. हा चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी पालिकेत सोनवणे कायम राहतील अशी धडपड काही लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

Story img Loader