ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने गळा लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जगदाळे यांनी नुकतीच भेट घेतली असून या भेटीनंतर येत्या ९ फेब्रुवारीला जगदाळे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर, या संदर्भात योग्यवेळी भुमिका जाहीर करणार असल्याची प्रतिक्रीया जगदाळे यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड असून, या भागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. तर, ठाणे शहरातून राष्ट्रवादीचे केवळ आठ नगरसेवक निवडून आले होते. लोकमान्यनगर येथील प्रभाग क्रमांक ६ आणि राबोडी येथील प्रभाग क्रमांक १० मधून हे नगरसेवक निवडून आले होते. हे नगरसेवक निवडून आणण्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामुळे नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. असे असतानाच नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने गळा लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – बदलापूर : शिक्षिकेचे मंगळसुत्र पळवले दुचाकीवरून आलेल्या दोघांचे कृत्य, गुन्हा दाखल
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात होते. त्यावेळेस हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी एका वजनदार पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या दोघांचा थेट प्रवेश करून घ्यायचा की, ठाणे विकास आघाडी करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याबाबत प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या भेटीनंतर जगदाळे हे बाळासाहेबांच्या पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. या संदर्भात हणमंत जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता, या संदर्भात योग्यवेळी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.