लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: येत्या १ मे रोजी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघासह संपूर्ण ठाणे शहरभर बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे वज्रमुठ सभेला येण्याचे ठाणेकरांना आवाहन केले असले तरी राष्ट्रवादीने पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात मोठ्याप्रमाणात बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ता बदलाचा केंद्रबिंदू म्हणून ठाणे जिल्हा ओळखले जाते. ठाणे जिल्ह्यावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. हा संपुर्ण परिसर त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओ‌ळखला जातो. ठाणे शहरात शिवसेनेचा प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी हे दोन्ही नेते एकमेकांच्या मतदार संघात फारशी ढवळाढवळ करताना दिसत नव्हते. राज्यातील सत्ताबदलानंतर मात्र हे चित्र बदलेले असून या दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते तयार झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदार संघात शिरकाव करत पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे.

आणखी वाचा- ठाण्यात नवाकोरा रस्ता खोदला, पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे ठाणेकरांना दर्शन

पालिका प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात शक्तीप्रदर्शन केल्याचे गेल्या काही महिन्यांत दिसून आले आहे. त्यापाठोपाठ आता आव्हाड यांनीही वज्रमुठ सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघात शिरकाव करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नागपुर आणि पाचोरा याठिकाणी वज्रमुठ सभा पार पडल्या असून येत्या १ मे रोजी मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुल येथे वज्रमुठ सभा होणार आहे. मुंबई तसेच आसपासच्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही सभा महत्वाची मानली जात आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघासह संपुर्ण ठाणे शहरभर बॅनर लावले आहेत.

वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने संपुर्ण ठाणे शहरभर बॅनर लावले आहेत. ठाणे शहरात ३८ ओवळा-माजिवाडा मतदार संघात १६ बॅनर लावण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघात २८ बॅनर लावण्यात आले आहेत. किसननगर, शिवाजीवाडी, रहेजा, आनंदनगर, कोपरी बारा बंगला आणि भाजी मंडई या परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Story img Loader