ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांनी कळवा परिसरात नवीन गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरु केले असून त्यासाठी कळव्यातील प्रकल्पांचा उल्लेख करत कल‘वा’हा होगा अशी जाहिरातबाजी करून कळव्याची स्तुती केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशर यांनी कळव्याची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, ‘वाह आशर वाह’ असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरुन आशर यांचे आभार व्यक्त केल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत असलेला कळवा आणि मुंब्रा परिसर एकेकाळी अस्वच्छ होता आणि याठिकाणी पायाभूत सुविधांची वाणवा होती. २००९ मध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड हे या भागातील मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात विविध प्रकल्पाची उभारणी करण्यास सुरुवात केली. या प्रकल्पामुळे कळवा आणि मुंब्रा भागाचे महत्व गेल्या काही वर्षात वाढले असून त्याचबरोबर याठिकाणी नवनवीन गृहप्रकल्पही उभे राहत आहेत. त्यातच आता याच भागात शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांनी नवीन गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पाची जाहिरातबाजी करण्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला असून त्यात कळवा भागातील प्रकल्पाचा उल्लेख केला आहे.
ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून अजय आशर हे परिचित आहेत. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते बांधकाम संघटनेचे पदाधिकारी आहेत. करोना काळात बांधकाम व्यावसायिकांनी रुग्णालय उभारणीसाठी पालिकेला मदत केली होती. त्यासाठी निधीही देऊ केला होता. त्यात आशर यांची महत्वाची भूमिका होती. यापूर्वी त्यांनी सर्व गृहप्रकल्प ठाणे शहरात राबविले असून ते आता पहिल्यांदाच कळवा भागात नवीन गृहप्रकल्प उभारत आहेत. यावरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर उपहासात्मक पोस्ट शेअर करत आशर यांचे आभार मानले आहेत.
वाह आशर वाह
अजय आशर हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी ठाण्यामध्ये १०० हून अधिक इमारती बांधल्या आहेत. पण त्यांनी ठाण्याचे कधीही कौतुक करत स्वतःने बांधलेल्या घरांची विक्री केली नाही. परंतु त्यांचीच आता कळव्यामध्ये इमारती बांधायला सुरुवात केली आणि कळवा कस बदलयं , कळवा किती सुंदर आहे. हे सांगत आता ते आपलं मार्केटिंग करीत आहेत. म्हणजे आम्ही केलेल्या कामाची पोचपावतीच. बांधकाम व्यावसायिक आता आमदारांनी केलेले काम सुद्धा व्यवसायासाठी वापरू लागले आहेत. वाह आशर वाह अशी पोस्ट आव्हाड यांनी व्हिडीओसोबत शेअर केली आहे.