कळवा रुग्णालयात कालपासून तब्बल १६ रुग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच मनसे नेते अभिजित जाधव व ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी ठाणे पालिका प्रशासन व रुग्णालय प्रशासनावर संतप्त शब्दांत टीका केली.
नेमकं काय झालं?
कळवा रुग्णालयात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत तब्बल १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे अशा अनेक नेत्यांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा, डॉक्टर-नर्सची कमतरता, अपुऱ्या सोयी-सुविधांना दोष दिला असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्ण अत्यवस्थ अवस्थेतच दाखल झाले होते, अशी भूमिका घेतली आहे.
या सर्व प्रकारावर जितेंद्र आव्हाडांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “कृष्णा मेडिकोज कुणाच्या आशीर्वादाने आला? इथे पॅथॉलॉजी लॅब का नाही आहे? इथे रक्तचाचणी का नाही येत? तुम्ही जेवणात दोन अंडी का नाही देत? खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी शांत आहे. कारण मग लोक म्हणतात कानाखाली आवाज काढेन”, असं म्हणत आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू; शेवटच्या क्षणी दाखल केल्याचा प्रशासनाचा दावा!
“बेशरमपणाची हद्द आहे”
“बेशरमपणाची हद्द आहे. पाच मृत्यू झाल्यानंतर कुणीही काळजी घेतली नाही. आम्ही बडबडून गेलो. शेवटी प्रशासनावर कुणाचा हक्क असतो? महापालितेचा असतो. माळगावकर स्वभावाला चांगला माणूस आहे. पण डोकं नसलेला माणूस आहे. ज्यांचं इथे काम नाही, त्यांनाच इथे आणून ठेवलं आहे. या मृत्यूंना सर्वस्वी महापालिकाच जबाबदार आहे. १७ मृत्यूंची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी लागेल. हे ठाणेकरांना न शोभणारं आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस गरीब घरातला असतो. वाडा, मोखाडा, पालघरमधून आदिवासी लोक येतात उपचारांसाठी. त्यांचं जेवणही हे प्रशासन खातं. खायला दोन अंडी दिली पाहिजेत. प्रोटीन्स दिले पाहिजेत. वाडग्यात भात आणि डाळ देतात खायला”, असा आरोप आव्हाडांनी केला.
आव्हाडांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न
“हे बेशरम प्रशासन आहे. आजही रुग्णालयात नर्स, डॉक्टर्स कमी आहेत. याची जबाबदारी कुणी स्वीकारणार की नाही? की गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात? मुख्यमंत्र्यांनी पाच मृत्यूंनंतर तातडीने बैठक घ्यायला हवी होती. हे त्यांचं शहर होतं. तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. तुम्ही कुठलीच अपेक्षापूर्ती केली नाही, तर कसं जमायचं?” असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
“कळव्यात मृत्यूचं तांडव, रुग्णांना मरायला…”, एका रात्रीत १६ रुग्ण दगावल्याप्रकरणी मनसे आक्रमक…
“प्रशासनाची चावी माझ्या हातात नाही. माझ्या हातात असतं तर एव्हाना त्या डीनचं कानशिल लाल केलं असतं मी. तो डीन बेशरम आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावनाही हलत नाहीत. बाजूला माणसं रडतायत आणि तुम्ही मृतदेह आयसीयूमध्ये ठेवताय. सात ते आठ तास एक मृतदेह बेडवरच पडलेला असतो. थोडी तरी माणुसकी दाखवा. जिवंत रुग्ण बाजूला झोपलेत आणि मेलेला रुग्ण मधोमध झोपलाय. तुम्हाला कसं वाटेल?” अशी उद्विग्न प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.