ठाणे : शरद पवार यांना या वयात त्रास देऊ नका, मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, तुम्हाला राजकारणात दिसणार नाही, तुम्ही परत या, असे आवाहन राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केले आहे.
येवले दौऱ्यावर निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरले असे त्यांना वाटते. पण मी शरद पवात यांच्या गुप्त किंवा मुख्य बैठकांना कधीच नसायचो. माझी इच्छाही नसायची. कारण माझे ठरले होते की त्यांनी केले तर त्यांच्यासोबतच राहायचे. ते जो निर्णय घेतील त्यांच्यासोबतच राहायचे. त्यामुळे मी बैठकांना जायचे टाळायचो. आपल्या कानावर काही गोष्टी पडतील, त्या सहन होणार नाहीत. त्यामुळे आपण लांबच राहावे. पण आता जर ते म्हणत असतील आम्ही आवतीभोवती आहे म्हणून त्रास होतो, तर आम्ही बाजूला होतो, असे आव्हाड म्हणाले.
आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरल्यामुळे हे सर्व झाले आहे, तर तुम्ही परत या…मी निघून जाईन, अशी मी येवल्यात जाऊन शपथ घेईन, असे त्यांनी सांगितले. ७५ वर्षे काम केल्यानंतर माझे बाबा घरी बसले आणि ते परत कधी उठले नाही. त्यामुळे काम न करता घरी बसल्यावर काय होते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे जादूगार असलेल्या पवार साहेबाना घरी बसा बोलणे हे मनाला वेदना देणारे आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ठाण्यात एसटी बसचा अपघात, दोन जखमी
शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शरद पवार यांचे आनंद नगर चेक नाका येथे आगमन झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी “आम्ही सारे साहेबांसोबत, देशाचा बुलंद आवाज शरद पवार, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यानंतर पवार यांनी नाशिकच्या दिशेने कूच केले. यावेळी ठाण्यातील कार्यकर्तेही आपापल्या गाड्यांमधून दौर्यामध्ये सहभागी झाले.