भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सामाजमाध्यमांवर बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला असून यामुळे ते महाराष्ट्राच्या कि कर्नाटकाच्या बाजूने आहेत, हेच कळत नसल्याची टिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद पुकारण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बोलणे झाले असून हे सर्व नेते एकत्रितपणे महाराष्ट्र बंदची तारीख जाहीर करतील. तसेच या संदर्भात उद्या होणाऱ्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक मध्यरात्री बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहतूक बदल लागू
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सामाजमाध्यमांवर बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला आहे. महाराष्ट्रामध्ये बेळगावचा उल्लेख हा बेळगाव असाच केला जातो तर, कर्नाटकमध्ये बेळगावी असा उल्लेख केला जातो. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या कि कर्नाटकाच्या बाजूने आहेत, हेच कळत नसल्याची टिका आव्हाड यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातील पहिल्या पाचमधील एक मंत्री असून त्याचबरोबर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दिल्लीत चांगले वजन असलेले नेते आहेत. ते आपल्या समाजमाध्यमांवर बेळगावचा उल्लेख बेळगावी करतात. सीमावासिय आजही लढा देत असून जगभराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लढा आहे. सीमावासिय आजही बेळगावच म्हणतात आणि आम्ही मराठी माणसे बेळगावी म्हणायला लागलो. किती फऱक पडला आमच्यात. किती प्राण गेलेत त्या लढ्यात, त्यांचा हा अपमान नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>>भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केला; जितेंद्र आव्हाड यांची पाटील यांच्यावर टिका
महाराष्ट्र बंद पुुकारण्याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांचे एकमेकांशी बोलणे झाले असून त्यात एक तारीख नक्की करायची की त्या दिवशी महाराष्ट्र बंद करायचा, अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत हे सर्वांशी बोलत आहेत. हे सर्व नेते एकत्रितपणे महाराष्ट्र बंदची तारीख जाहीर करतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. दिल्लीच्या तख्तासमोर न झुकलेला महाराष्ट्र झुकलेला दाखवायचा, यात दिल्लीश्वारांना मज्जा येते, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र बंद मोठा असेल किंवा छोटा असेल हे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील. मी आदेशाचा धनी आहे. तारीखही हेच नेते ठरवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाही नाही. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी दिल्लीच्या मनात आकस आहे, हे लपून राहिलेले नाही, असेही ते म्हणाले. महात्मा फुले यांच्याविषयी राज्यपाल जेव्हा बोलले, तेव्हाच मराठी माणसाने उठायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.