शाई फेकप्रकरणाचे समर्थन होऊ शकत नाही पण, या गुन्ह्यात लावण्यात आलेले ३०७ कलमाचेहि समर्थन होऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. आपले विचार आणि लोकांसाठी आंदोलन करणे हे राजकीय जीवनाचा भाग असतो. पण अशी आंदोलने करणाऱ्या तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याच्या दिशेने राज्यकर्त्यांचा कारभार सुरु आहे. त्यामुळे ३०७ कलम लावण्यात आलेल्या तरुणाच्या मागे राष्ट्रवादी पक्षाने ठाम उभे राहायला हवे, अशी मागणीही त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आभासी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी शरद पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला. आंदोलन करणे राजकीय जीवनाचा भाग आहे. मी आंदोलने केली नसती तर कदाचित मी तुमच्या नजरेसमोर आलो नसतो. तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात. आपल्या विचारांसाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी रस्त्यावर उतरणे हे आम्ही शरद पवार यांच्याकडून शकलो असून यामुळेच राज्यकर्त्यांनी 307 कलम लावलेल्या तरुणांच्या पाठीमागे आपल्या पक्षाने ठाम उभे राहावे, अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली.
शरद पवार यांच्यावर तरुणांचा प्रचंड विश्वास आहे. शरद पवार म्हणजे सर्वस्व. कदाचित हे राष्ट्रवादीचे नसतील पण मी शरद पवारांचा आहे हे सांगण्यात त्यांना कुठलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. त्यामुळे आपल्याला देश वाचवायचा असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा त्याच ताकतीने बाहेर पडावे लागेल. हा पुरोगामी विचारांचा, गांधी नेहरूंचा भारत आणि हा शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र पुढे घेऊन जावा लागेल. ती कर्नाटकची सीमा असो किंवा गेल्या महिन्याभरात झालेले सर्व महापुरुषांवरचे हल्ले असो. मला वाटते महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि आपल्या भूमिकेची वाट बघतोय. तुम्ही सांगाल त्या मार्गाने पुढे जायला तयार आहे, असेहि आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत देसले पाड्यातील तरुणांकडून वाहन चालकाला बेदम मारहाण
एक महिला संसार चालू शकते तर ती राज्य आणि देशही चालू शकते, हे शरद पवार यांचे मत आहे, असे मला वाटते. महिलांना मुख्य प्रवाहात सामील केल्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही, हे महात्मा फुलेंनी सांगितले. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर हि विचारधारा जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर म्हणजे शरद पवार आहेत, असेही ते म्हणाले. इतिहासातील एखाद्या विषयावर जेव्हा भांडत असतो, तेव्हा पक्षातलेही अनेक जण माझ्या विरोधात असतात. पण त्यावेळी शरद पवार हे माझ्या मागे उभे असतात, असे सांगत आव्हाड यांनी या संदर्भातील उदाहरणे यावेळी दिली.