ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत शिवसेना हाच मोठा भाऊ आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यात निवडणुक जिंकायची असेल तर शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घ्यावाच लागेल, असे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा ठाणे महापालिकेवर फडकवायचा असल्याची भुमिकाही त्यांनी मांडली. ठाण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी ठाण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
हेही वाचा >>> ठाण्यात महाविकास आघाडी आणि पोलिस संघर्ष वाढण्याची चिन्हे; ठाकरे गटाच्या चौकसभांना पोलिसांकडून मनाई
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे नेते राजन राजे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपुर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. ठाणे जिल्ह्यात शिवसेना मोठा भाऊ आहे. ठाणे जिल्ह्यात जिंकायचे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल, असे मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकावयाचा आहे, असेही ते म्हणाले. सध्या लोकसभा निवडणुकीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्या सर्व्हेक्षणात ‘इंडिया’ आघाडीवर आहे. देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवतील, अशी घोषणाही त्यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील, त्यांना निवडून आणू. केवळ लोकसभेची निवडणुक नाहीतर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही महाविकास आघाडी म्हूणन सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले.