ठाणे : पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करत आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. येत्या सहा महिन्यांत हे सरकार बदलणार आहे. अतिजास्त थराला जाऊ नका, तुम्हाला ऐकावे लागते हे माहीत आहे. जेवढे ऐकायचे, तेवढेच ऐका, परंतु मर्यादेबाहेर जाऊन वागाल तर आम्हीपण डोक्यात ठेऊ असा थेट इशारा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे. ठाण्यातील साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचे नाव घेत त्यांच्या कार्यपद्धतीवरही आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या रडारवर पोलीस अधिकारी असल्याची चर्चा आता रंगली आहे.
शिवसेनेच्या फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकप्रतिनिधी मोठ्याप्रमाणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये विस्तव जात नाही. सुमारे दीड वर्षांपूर्वी श्रीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी हा हल्ला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला होता असा आरोप ठाकरे गटाने केला होता. रोशनी शिंदे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते असा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी करत होते. याप्रकरणानंतर उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जयजीत सिंग कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.
पोलिसांकडून तडीपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली होती. मुंब्रा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलीस एकतर्फी कारवाया करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली जात होती.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करत आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. येत्या सहा महिन्यांत हे सरकार बदलणार आहे. अतिजास्त थराला जाऊ नका, तुम्हाला ऐकावे लागते हे माहीत आहे. जेवढे ऐकायचे, तेवढेच ऐका, परंतु मर्यादे बाहेर जाऊन वागाल तर आम्हीपण डोक्यात ठेऊ.
हेही वाचा…लोकलमधून पडून डोंंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू
त्यामुळे गोळ्या घालायच्या असतील किंवा मोक्काअंतर्गत कारवाई करायची असेल तर आत्ताच करा असा इशारा आव्हाड यांनी दिला. आम्ही अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढत राहू. ठाण्यात अत्याचार वाढत आहे, कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना अटक झाली आहे. ही कारवाई करणारा अधिकारी शेखर बागडे आहेत. या अधिकाऱ्यामुळेच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद झाले होते असा उल्लेख आव्हाड यांनी केला. इंडिया आघाडीचा सूर हा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर होता. त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या रडारवर पोलीस असल्याचे दिसून येत आहे.