ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीने मुंब्रा शहरात शनिवारी मूकमोर्चा काढला. वेळीच कारवाई झाली नाहीतर आंदोलन उग्र होऊ शकते, असा इशारा राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्यासाठी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीला सुपारी देण्यात आल्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या ध्वनिफीतीमधील आवाज साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यानंतर महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आव्हाड यांनीही धमकी प्रकरणी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आहेर यांच्याविरोधात कारवाईसाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जात आहेत. अशाचप्रकारे शनिवारी मुंब्रा शहरात राष्ट्रवादीने मूक मोर्चा काढला.
हेही वाचा – ठाण्यात अनधिकृत इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पडून दोन चिमुकले जखमी
आहेर यांना महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करावे. तसेच त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विकासकामे करून मुंब्य्राचा कायापालट केला आहे. त्यामुळे मुंब्रा येथील जनता आव्हाडांवर प्रेम करते, हे दाखविण्यासाठीच जनता आज रस्त्यावर उतरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा पुरविण्याची घोषणा करून दोन आठवडे उलटले आहेत, मात्र ही सुरक्षा देण्यात आलेली नाही. तसेच, तक्रार करूनही गुन्हा दाखल केला जात नाही. यावरून ठाणे पोलिसांची हतबलता आणि दुर्बलता दिसून येते, अशी टीका शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी यावेळी केली. आज हा मोर्चा मूक आहे, पण जर वेळीच कारवाई झाली नाही तर हा मोर्चा उग्रही होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.