ठाणे : समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजनेच्या नावाखाली ठाणे शहरातील सर्व ‘विकास’ एक ते दोन विकासकांच्या घशात घालण्याचे मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केले आहेत. तसेच भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या शंभरमध्ये असलेल्या दोन कुठल्या तरी बिल्डरला पहिल्या २० मध्ये आणण्यासाठी ठाणे महापालिका मदत करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजनेच्या नावाखाली ठाणे शहरातील सर्व ‘विकास’ एक ते दोन विकासकांच्या घशात घालण्याचे मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे. लँडबँकच्या माध्यमातून बिल्डर्स आपले भांडवली मूल्य (ॲसेट व्हॅल्यू ) वाढवितात आणि त्यातून स्वतःच्या धन निर्मितीसाठी त्याचा फायदा करून घेतात. त्यास ठाणे महापालिकेकडून हातभार लावला जात आहे. ठाणे महानगर पालिकेचे जे काम नाही ते काम महानगर पालिका विशेष रूची घेऊन करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे शहरात पाणी नाही, शहरातील कचरा उचलला जात नाही. शहरातील महत्वाचे रस्ते खोदून ठेवले आहेत. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे, याकडे लक्ष देण्याऐवजी म्हाडाच्या जमिनी कशा ताब्यात घ्यायच्या, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गोरगरीबांनी आपल्या पक्क्या घरांची स्वप्ने, ज्या एसआरएच्या माध्यमातून पाहिली. त्या झोडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) ही गेली अनेक वर्षे कपाटात बंद करून ठेवली आहे आणि सगळे डोळे फक्त क्लस्टर योजनेकडे लावले आहेत. क्लस्टर का आणि कशासाठी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
बिल्डर्सची नावे आज ना उद्या फुटणारच
दोन कुठल्या तरी बिल्डर्सना, जे भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या शंभरमध्ये आहेत. त्या बिल्डर्सला पहिल्या २० मध्ये आणण्यासाठी ठाणे महानगर पालिका त्यांना मदत करीत आहे. ठाणे महानगर पालिकेचे जे काम आहे ते करीतच नाहीत. मात्र गोरगरीबांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम अगदी रस घेऊन करीत आहेत. हे करतात कोणासाठी नेमके, कोण आहेत ते बिल्डर्स, ज्यांच्यासाठी हा कट रचला जातोय. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात सध्या कोणाची कामे चालू आहेत, कोणी मोठ्या – मोठ्या जमिनी विकत घेतल्या आहेत, कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाहीच. त्या बिल्डर्सची नावे आज ना उद्या फुटणारच आहेत. मात्र, ठाणेकरांना जे गरजेचे आहे. ते ठाणेकरांना ठाणे महानगर पालिकेने द्यावे. नको त्या धंद्यात पडू नये, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
बिल्डरांचं हित साधू पाहणारे हे नेते कोण ?
ठाण्यात शिवाईनगर सारखी एक जुनी लोकवस्ती आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हाडा वसाहती आहेत. या म्हाडा वसाहतींमधून वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना आता पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. पुनर्विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांना क्लस्टरचा फास लावण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे होत आहे. म्हाडा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकासाचा अधिकार नाही का, क्लस्टरचा फास त्यांच्या भोवती कोण आवळत आहे, लोकांनी न्यायालयीन लढा दिल्यावरच महापालिकेला आणि संबंधित राजकीय नेत्यांना शहाणपण येणार का, क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या बिल्डरांचं हित साधू पाहणारे हे नेते कोण आहेत, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.