नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर शहरात भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणाली स्वीकारण्याचा सत्ताधारी शिवसेना-भाजपचा निर्णय वादग्रस्त ठरू लागला आहे. या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर करवाढ होणार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मालमत्ता कराच्या पावत्यांची नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर होळी केली.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने मालमत्ता करात केलेल्या साडेतीन पट करवाढी विरोधात शहरात राजकीय वातावरण पेटले आहे. नगरपरिषदेने १ एप्रिल २०१४पासून भांडवली मूल्यावर आधारीत करप्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत भाडे मूल्यावर कर आकारणी करण्यात येत होती. परंतु या नव्या निर्णयाने नागरिकांना पूर्वीपेक्षा ज्यादा कर भरावा लागणार आहे, असा विरोधी पक्षांचा दावा आहे. बदलापूर नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी शिवसेना-भाजपने प्रशासनाने मांडलेली ही नवी कर प्रणाली स्वीकारण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत सापडले असून या मुद्दयावरुन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार
बदलापूरात नगरपालिका स्तरावर विकास कामांच्या आघाडीवर फारसे सकारात्मक चित्र नाही. शहरातील खराब रस्ते, धूळीचे साम्राज्य, पाण्याचा प्रश्न या समस्या असल्याने येथील रहिवासी त्रस्त आहेत. या मुद्दयावरून सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जात असताना नव्या करप्रणालीचा स्वीकार करत सत्ताधाऱ्यांनी डोकेदुखी वाढवून घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. भांडवली मुल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणालीस ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच महापालिकांनी लाल बावटा दाखविला आहे. असे असताना बदलापूर नगरपालिकेने त्यास हिरवा कंदील दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोच्र्याला फारसा प्रतिसाद नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुद्दयावरुन काढलेल्या मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जेमतेम ७०-८० कार्यकर्त्यांसह निघालेल्या या मोच्र्यामुळे हसे झाले. भांडवली मूल्यावर आधारीत कर संरचेनेचा निर्णय घेतला असताना सभागृहात याच पक्षाचे नगरसेवक होते. तेव्हा या पक्षाकडून कोणताही आवाज या मुद्दय़ाविरोधात उठविण्यात आला नव्हता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांने आपले नगरसेवक सभागृहात काय करत होते, याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

Story img Loader