ठाणे – महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर लागू केलेले वाहतूक बदल आणि त्याचबरोबर अरुंद रस्त्यांवर बसविण्यात आलेले दुभाजक यामुळे शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या कारभारावर टिका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ठाणे शहरात लागू केलेले वाहतूक बदल आणि अरुंद रस्त्यावर बसविलेले दुभाजक यामुळे वाहतूकीचे बोजवारा उडाला असून या संदर्भात आमच्या युवक संघटनेकडून ठाणे वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतरही बदल झाले नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिला आहे. आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या हिताच्या प्रश्नासाठी लढणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच महामार्गावरील चौकात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्याचबरोबर अनेक अरुंद मार्गांवर दुभाजक बसविले आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई
या दुभाजकांमुळे अपघात होऊ लागले असून त्याचबरोबर वाहतूक बदलांमुळे कोंडी वाढल्याची वाढल्याची ओरड होत आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पक्षाची भुमिका मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाड्यातील गोखले रोड, उथळसर तसेच इतर अंतर्गत अरुंद रस्त्यांवर दुभाजक बसविण्यात आले आहेत. यामुळे येथील वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. उथळसरला दुभाजकांवर वाहन आदळून अपघात होत आहेत. शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी चौकाजवळ दोन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून तेथून अवजड वाहतूक सोडण्यात येत आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. माजिवाडा, कॅडबरी आणि घोडबंदर भागात केलेल्या बदलांमुळेही वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्यांची तोडफोड, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी
अशाप्रकारे वाहतूकीचे नियोजन करणारा पोलिस उपायुक्त आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक ठाणे शहराध्यक्ष विरु वाघमारे हे वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना पत्र देणार आहेत. त्यात रस्त्यावर बसविलेले दुभाजक काढण्याची आणि लागू केलेले बदल पुर्ववत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यानंतरही बदल झाले नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या हिताच्या प्रश्नासाठी लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुर्वी राष्ट्रवादी पक्ष हा राज्यात सत्तेत होता, त्यावेळेस क्लस्टर योजनेसाठी आम्ही ठाणे बंद केले होते, असे सांगत त्यांनी आताही सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले.