पवारसाहेब, आयात उमेदवार देऊ नका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाची विनंती

शिवसेनेतून सुभाष पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून त्यामुळे वडनेरे नाराज असल्याचे बोलले जाते.

ncp sharad pawar badlapur city chief demand local candidate for murbad assembly constituency
मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षात उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.

बदलापूरः एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. आता सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या रूपाने लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाच्या वाट्याला आली असल्याने मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. अशा वेळी या खासदारकीसाठी मेहनत घेतलेल्या पक्षातल्या इच्छुकांना बाजूला सारून आयात उमेदवार देऊ नका. अन्यथा त्या उमेदवाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा थेट इशारा बदलापूर शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिला आहे. मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी शैलेश वडनेरे इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेतून सुभाष पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून त्यामुळे वडनेरे नाराज असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा >>> Raj Thackeray : राज ठाकरेंची ठाण्यात खाद्यभ्रमंती; आधी मामलेदार, मग प्रशांत कॉर्नर, झणझणीत मिसळ आणि चटकदार पाणीपुरी!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवात अंतर्गत भाजपच्या विरोधाचाही हात असल्याची चर्चा होती. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाच्या सुरेश (बाळ्यमामा) म्हात्रे यांचा धक्कादायक विजय झाला. याच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा हा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सध्या भाजपात असलेले आमदार किसन कथोरे यांनी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत केला आणि त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फटकाही बसला. मधल्या काळात आशिष दामले, प्रमोद हिंदुराव यांनी काही अंशी पक्ष जीवंत ठेवला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शैलेश वडनेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाची धुरा सांभाळली. त्यांनी लोकसभा निवडणुकीतही सुरेश म्हात्रे यांच्यासाठी काम केले. त्यामुळे म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा >>> किणीकरांना पाडायच असेल तर उमेदवार देऊ नका; अंबरनाथच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

आता मुरबाड विधानसभा मतदारसंघातून शैलेश वडनेरे भाजप आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखती, बैठकांमध्ये शैलेश वडनेरे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना हिरवा कंदिलही दाखवल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सध्या शिवसेनेत असलेले सुभाष पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे बदलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे शहर अध्यक्ष आणि इच्छुक शैलेश वडनेरे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत अशा चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मी या मतदारसंघातून इच्छुक असून पक्षाची सर्व प्रक्रिया मी पार पाडली आहे. पक्षाने आयोजीत केलेल्या मुलाखतीत जाऊन मी माझ्या कार्याचा आढावा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनाही भेटून चर्चा झाली आहे, असे शैलेश वडनेरे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसात बदलापूर आणि मुरबाडचे काँग्रेस पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, कम्युनिस्ट संघटना, मुस्लीम समाज, संभाजी ब्रिगेड, कुणबी सेना यांच्यासह विविध संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. आम्ही लोकसभेत जोमाने काम केले. अशा स्थितीत आम्हाला डावलून आयाराम उमेदवार दिल्यास हा अन्याय असेल. त्यामुळे अशा उमेदवाराचे काम केले जाणार नाही. तसेच त्याला फिरूही दिले जाणार नाही, अशा इशारा शेैलेश वडनेरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षात उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar badlapur city chief demand local candidate for murbad assembly constituency zws

First published on: 18-10-2024 at 18:47 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
Show comments