ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयातील एका सभागृहात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचा जनसंवाद कार्यक्रम पार पडत असून त्यास आक्षेप घेत शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामुल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, मुख्यालयात जागा उपलब्ध करून देणेबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आता पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शिंदेच्या सेनेचे स्थानिक शिलेदारांनी शहरात जनसंवाद उपक्रम राबविण्यास सुरूवात केली.
पालिका मुख्यालयातील एका सभागृहात हा जनसंवाद कार्यक्रम पार पडत आहे. मात्र, पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना शिवसेना (शिंदे गट) पक्षाला विनामुल्य सभागृह कसे उपलब्ध करून दिले जाते, याविषयी प्रश्न उपस्थित होत असून हाच मुद्दा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनीही उपस्थित करत जनसंवाद उपक्रमावर आक्षेप घेतला होता. तसेच शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामुल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी देसाई यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
मात्र, त्यावर पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता सुहास देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माध्यमातून महानगर पालिकेमध्ये जनता दरबार घ्यायचा आहे. परंतू पालिका मुख्यालयात जागा उपलब्ध करून देणेबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही, असे देसाई यांनी सांगितले. तसेच पालिकाआयुक्त जर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला जागा उपलब्ध करून देणार नसतील तर आम्ही जनतेच्या समस्या ऐकून त्या प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच टेबल खुर्च्या मांडून जनता दरबार भरवू, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.