ठाणे : बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्राताई पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे, असा प्रश्न शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. परंतु ते असे म्हणत असतील तर, मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते. त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्ठावान असल्याचे शिवतारे यांनी म्हटले असून याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले. आमचे श्रद्धास्थान शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही अनेक आरोप केले. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की, निष्ठेची व्याख्या काय आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – कल्याण लोकसभेचा उमेदवार काठावरच पास होणार, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची माहिती

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे. पण गेल्या दोन दिवसापासून शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत आणि मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहित नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ठाण्यात राहुल गांधी येताहेत पण, पत्रकार परिषद भलतेच घेताहेत; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप

मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार आहेत. एकीकडे म्हणायचे पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. एकीकडे म्हणायचे सुनेत्रा पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे. असे असले तर मग, २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने मतदान करताना असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते, असा प्रश्न परांजपे यांनी उपस्थित केला आहे.