सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर सातत्याने खोटे गुन्हे नोंदविण्याचे प्रकार ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. ज्यांना विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही ते पोलिसांना हाताशी धरून असे प्रकार करत आहेत. तर काही जण केवळ मुख्यमंत्र्यांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठीच आमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत असून आम्ही या गोष्टींना अजिबात घाबरणार नाही. असे मत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शहापूर: लोकलला उशीर झाल्याने आसनगाव स्थानकात प्रवाशांचा रेलरोको

राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी गुरुवारी पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाचे चित्रीकरण त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर प्रसारित केले. त्यांनी ट्विट करताना ‘दिल्लीचे मिंधे.. एकनाथ शिंदे’ असे ट्विटमध्ये लिहिले होते. तसेच आंदोलनातही ही घोषणा केली होती. याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध ठाणेनगर, श्रीनगर, चितळसर, डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. त्याआधारे, ठाणेनगर, श्रीनगर आणि चितळसर पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्याविरोधात बदनामीकारक घोषणा दिल्याप्रकरणी तसेच परवानगी विना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, मानपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणावर भाष्य करत परांजपे यांनी सरकार विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याची टीका केली आहे.

हेही वाचा- करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांची बैठक; आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश

गुरुवारी केलेल्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणामध्ये असंसदीय शब्द वापरले नाही, तसेच एकही घोषणेमध्ये समाजात तेढ निर्माण करणारे शब्द नव्हते. तरीही माझ्याविरुद्ध जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करत असल्याबाबतचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये माझ्यावर नोंदविण्यात आले आहे. ठाणे पोलीस याबाबत जी कायदेशीर प्रक्रिया करतील त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. मात्र सध्या सत्तेचा गैरवापर करून विरोधकांवर कसे खोटे गुन्हे नोंदविले जातात हे सर्व ठाणेकरांना दिसत आहे. असेही परांजपे यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा समजला जाणारा ठाण्यातील एक नेता पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. या नेत्याला एकनाथ शिंदे यांनी वेळीच आवरावे अन्यथा एकनाथ शिंदे यांचे जहाज बुडविण्यास हा नेताच कारणीभूत ठरेल असे परांजपे यावेळी म्हणाले. तर परांजपे हे नेमके कोणाला उद्देशून म्हणाले याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncps thane city president anand paranjapes criticism of jayant patils suspension from maharashtra assembly winter session dpj