ठाणे शहरातील सर्वच मार्गावर कोंडीची समस्या भेडसावत असतानाच आता विकासकामांमुळे शहरातील विविध मार्गावर वाहतुकीचा दुहेरी ताण पडणार आहे. यामुळे शहरात मोठी कोंडी होऊन त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्हे आहेत. शहरातील विकासकामांमुळे पुढील दोन ते तीन वर्षे वाहतूक पोलिसांसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. यामुळे हे आव्हान पेलता यावे यासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाकडून जय्यत तयारी सुरू झाली असली, तरी अधिक ठोस नियोजनाची आवश्यकता व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांतील लोकसंख्या दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित करू लागली आहे. लोकसंख्या वाढते आहे तशी वाहनांची संख्याही वाढते आहे. हे बदल तसे स्वाभाविक होते. स्थानिक स्वराज्य सस्थांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही आणि त्याचे विपरीत परिणाम आता ठाण्यासह संपूर्ण जिल्ह्य़ातील शहरी भागातील रहिवाशांना भोगावे लागत आहेत. वाहने वाढली मात्र रस्त्यांची रुंदी काही वाढली नाही. परिणामी जिल्ह्य़ातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि अन्य शहरे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडल्याचे चित्र आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेतच, शिवाय अवजड वाहनांच्या भारामुळे महामार्गही कोलमडून पडू लागले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी जिल्ह्य़ातील विविध मार्गाचे रुंदीकरण, उन्नत मार्ग, नवे पर्यायी रस्ते असे उपाय आखले जात आहेत. या कामांचा उरक होताना किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. ठाणे शहरातील तीन पेट्रोल पंप, गीता सोसायटी, ठाणे स्थानक परिसर आणि शहरातील अन्य भागातील वाहतूक मार्गात बदल केले असून त्यापैकी काही बदल कायमस्वरूपी केले आहेत. जिल्ह्य़ातील अन्य शहरांमध्येही वाहतूक मार्गात असे बदल करण्यात आले आहेत. शहरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्यामुळे त्यांचे रुंदीकरण करणे शक्य नाही. यामुळे अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमध्ये बदलांचे प्रयोग करण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. अशा बदलांना अनेकदा नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता असते. तरीही ठाणे वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने आणि डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी अशा बदलांचे प्रयोग केले. विद्यमान पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनीही बदलांची ही परंपरा कायम ठेवली आहे. हे बदल पचनी पडत नसल्यामुळे विरोध होणे स्वभाविक आहे. पण, वाहतूक कोंडीला उतारा शोधताना असे प्रयोग महत्त्वाचे ठरणार आहेत. यामुळे तात्पुरती का होईना कोंडीमुक्त प्रवासाकरिता शहराची ही गरज आहे हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. शहरातील वाहतुकीत बदल करण्यापूर्वी त्या भागातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे असून त्या आधारेच बदलांचा प्रयोग राबविला जावा, असा एक मतप्रवाह आहे. जेणेकरून या बदलामुळे स्थानिकांच्या तक्रारीला फारसा वाव राहत नाही आणि या बदलाचा परिणाम दुसऱ्या मार्गावर होऊन कोंडी होत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे बदल ही काळाची गरज असली, तरी त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे आहे.
‘पुणे पॅटर्न’ सोयीचा अन् अडचणीचा?
शहरातील वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच शहरात पुरेशा वाहनतळांची सोय नाही. यामुळे रस्त्यावर वाहने उभी करण्याशिवाय चालकांपुढे पर्याय नाही. वाहनतळ सुविधा नसल्यामुळे नागरिकांकडे दुसरा पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्यंतरी घेतला असून त्यासाठी अ, ब, क अशाप्रकारे रस्त्याचे वर्गीकरण करून वाहनांसाठी पार्किंगचे दर ठरविले आहेत. असे असले तरी रस्त्यांची रुंदी मात्र एका मर्यादेपल्याड वाढविता येणे शक्य नसल्याने आधीच कोंडीत अडकलेले रस्ते वाहनतळ सुविधेमुळे ठप्प होण्याची शक्यता आहे. ठाणे स्थानक परिसरात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अनेक जण नौपाडा भागात तसेच शहराची मुख्य धमनी असलेल्या गोखले मार्गावर वाहने उभी करतात आणि त्यानंतर पुढचा प्रवास रेल्वेने करून कामावर जातात. सकाळीच चाकरमानी वाहने उभी करून जातात आणि ती पुन्हा नेण्यासाठी रात्री उशिरा येतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. यातूनच मध्यंतरी स्थानिक आणि बाहेरचे असा वाद पुढे आला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुणे पॅर्टन राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार काही ठिकाणी सम-विषम तारखांच्या पार्किंगचा नियम रद्द करून तो मर्यादित काळ पार्किंग असा नवा नियम करण्यात आला. यामुळे ठरलेल्या वेळेत वाहन दुसऱ्या ठिकाणी हलविले नाहीतर त्या वाहनावर कारवाई करण्यात येते. नोकरदारांना ही वाहने कामावरून येऊन हलविणे शक्य नाही. यामुळे हा निर्णय स्थानिकांसाठी फायद्याचा ठरत असला, तरी नोकरदारांना अडचणीचा ठरत आहे. ठाणे शहरातील वाहतुकीची धमनी अशी ओळख असणाऱ्या गोखले मार्गावर नुकताच हा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र तो कितपत यशस्वी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
ठाणे शहरातील नौपाडा, मीनाताई ठाकरे चौक आणि अल्मेडा या भागात उड्डाण पुलांचे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी या भागात चाचपणीचे काम सुरू झाले आहे. याशिवाय, कळवा खाडीवर तिसरा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून त्याचेही काम सुरू झाले आहे. तसेच मुंबई-नाशिक मार्गावरील कोपरी पुलाचे रुंदीकरणाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शहरातील हे मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. मात्र या कामांमुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवावी लागणार आहे. यामुळे दुसऱ्या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढून मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. पुणे, नवी मुंबई तसेच कल्याण भागात जाणारे अनेक जण विना टोल प्रवासाकरिता कळवा मार्गाचा वापर करतात. याशिवाय, उरणच्या बंदरातून येणारी अवजड वाहने भिवंडी तसेच घोडबंदर मार्गे गुजरातकडे जाण्यासाठी कळवा-साकेत मार्गाचा वापर करतात. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या कामामुळे ही वाहने आता ऐरोली-मुंबई मार्गे ठाण्याच्या दिशेने वळविण्याचा विचार आहे. यामुळे एरोली-मुंबई मार्गे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होऊन मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी होण्याची चिन्हे आहेत. तसेच या कोंडीचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यावर जाणवण्याची शक्यता आहे. या कामांसाठी दोन ते तीन वर्षांचा काळ लागणार असल्याने तोपर्यंत शहरापुढे ही समस्या असणार आहे. यामुळे एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात सुरू होणाऱ्या विकासकामांमुळे होणारी कोंडी टाळण्याचे वाहतूक नियोजनाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. अशीच काहीशी अवस्था भिवंडी, कल्याण तसेच आसपासच्या शहरांमध्ये असून तिथेही अशीच कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक नियोजनाचे दुहेरी आव्हान वाहतूक पोलिसांना पेलावे लागणार आहे.
परिवहनच्या फे ऱ्या वाढवा..
गेल्या काही वर्षांपासून ठाणे पल्याड म्हणजे घोडबंदर भागात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. यामुळे या भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. असे असले तरी या वाढत्या शहरीकरणाचा लाभ उठविण्यात परिवहन उपक्रमाला पुरेसे यश आलेले नाही. यामुळे शहरासह घोडबंदर भागातील प्रवासी खासगी वाहनांकडे तसेच स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत आहेत. खासगी बससेवा बेकायदेशीर असली तरी ती प्रवाशांसाठी काळाजी गरज आहे. तसेच अनेक जण स्वत:ची वाहने वापरत असल्यामुळे शहरातील महामार्गावर वाहनांचा ताण वाढला असून, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मध्यंतरी खासगी बसचालकांनी बंदची हाक दिल्याने शहरातील रस्त्यांवर एकही खासगी वाहन धावत नव्हते. यामुळे प्रवासी पुन्हा टीएमटी तसेच अन्य परिवहन सेवेच्या बसगाडय़ांकडे वळले. परिणामी, टीएमटीच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन परिवहन उपक्रमाने खासगी बसप्रमाणे ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या तर प्रवाशांना सेवा मिळेल आणि परिवहनच्या उत्पन्नात वाढ होईल. विशेष म्हणजे, या बसगाडय़ांच्या फेऱ्या सातत्याने सुरू राहिल्या तर नागरिक कोंडीमुक्त प्रवासाकरिता त्याचा वापर करतील. यामुळे खासगी बसेसची मक्तेदारी संपुष्टात येऊन त्या बंद होतील आणि नागरिकांची वाहनेही फारशी रस्त्यावर येणार नाहीत. त्यामुळे विकासकामांमुळे होणारी कोंडी टाळायची असेल तर परिवहन बसकरिता स्वतंत्र मार्गाचा विचार करणे गरजेचे आहे. त्या दिशेने वाहतूक विभाग आणि पालिका प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.