कल्याण ते कर्जत तसेच कसारा मार्गावरील गावांचे झपाटय़ाने नागरीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे उल्हास आणि वालधुनी या दोन नद्या कमालीच्या प्रदूषित झाल्या असल्या, तरी येथील जंगल संपदेवर मात्र फारसा परिणाम झालेला नाही. सुदैवाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या वेशीवरील जंगलसंपदा टिकून आहे. बारवी परिसरातील जंगलात नुकत्याच आढळून आलेल्या रानगव्याने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र बदलापूरमधील वाढते नागरीकरण रोखून येथील हिरवाई जपण्याची आवश्यकता आहे..

भीमाशंकरच्या अभयारण्यातील सिद्धगडाच्या परिसरात उगम पावणारी बारवी नदी पुढे उल्हास नदीला येऊन मिळते. भीमाशंकरचे अभयारण्य ते उल्हास नदी या प्रवासात मात्र बारवी नावाचे मोठे जंगल आहे. हजारो हेक्टरवर पसरलेल्या बारवीच्या या जंगलातच ठाणे जिल्ह्य़ातील बहुतेक शहरांसाठी आवश्यक असलेला शुद्ध पाण्याचा साठा आहे. भीमाशंकरपासून ते थेट बदलापूपर्यंत या जंगल परिसरात मोठी वस्ती किंवा औद्योगिक वसाहत नसल्याने या पाण्याला अद्याप तरी प्रदूषणाची कीड लागलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील महानगरांचे आरोग्य आता बारवीच्या हातात असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९७२ मध्ये येथे बारवी धरण बांधले. त्यानंतर तीन टप्प्यात येथे धरण विस्तारीकरणाची कामे झाली. मात्र गावांचे स्थलांतरण केल्यानंतर उरलेल्या वन आणि महसुली क्षेत्राचा या जंगलात समावेश झाला. मानवी हस्तक्षेप कमी असल्याने येथील वनवैभव अद्याप टिकून आहे. मात्र हे टिकवण्यासाठी आतापासूनच हालचाली करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत या जंगलातील विविध प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि झाडांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. अनेक प्रवासी प्राणी आणि पक्ष्यांनी येथे येणे बंद केले आहे. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र येथील जैवविविधता टिकवण्यासाठी स्थानिक मासले ग्रामपंचायतीने केलेला ठराव मात्र स्तुत्य आहे. त्याचे अनुकरण जरी इतरांनी केले, तरी बारवी ते तानसा अभयारण्यातील हरित पट्टा विकसित होण्यासाठी हातभार लागेल आणि येथील प्राणी आणि वनसंपदा वाढण्यास हातभार लागेल.

बारवीच्या जंगलात अमाप वनसंपदा होती. शासनाच्या राजपत्रात उल्लेखलेल्या नोंदीनुसार येथील झाडांची उंचीही त्याकाळी तीस ते चाळीस फुटांपर्यंत होती. मात्र सध्या या जंगलात तितकी मोठी झाडे नाहीत. येथील वनसंपदा वाढण्याऐवजी कमी झाल्याचेच हे द्योतक आहे. गेल्या काही वर्षांत शेतीची बदललेली पद्धती याला काही अंशी कारणीभूत आहे. पालापाचोळा आणि झाडांचा कचरा शेतकऱ्यांकडून काढण्यात येत होता. त्यामुळे दोन झाडांमध्ये आग पसरण्याचा धोका कमी होता. मात्र आता तो कचरा तसाच राहिल्याने वणवा पसरण्याची शक्यता वाढली आहे. अवैधरीत्या चालणारी शिकार ही अनेकदा वणव्यांसाठी कारणीभूत ठरते. त्याचसोबत बेकायदेशीर वृक्षतोडही शासनाकडून मान्य केली जात नसली तरी ती होते आहे हेही अनेकदा समोर आले आहे. करवंदीसारख्या जाळ्या कमी झाल्याने लहान पक्षी आणि प्राण्यांचा वावर कमी झाला आहे. लहान पक्षी हे मोठे पक्षी आणि मध्यम प्राण्यांचे खाद्य असते. त्यामुळे लहान फळांच्या झाडांची कमी झालेली संख्या ही थेट मोठे प्राणी आणि पक्ष्यांवर परिणाम करणारी ठरली आहे. काही वर्षांपूर्वी इथे गिधाडेही दिसत असल्याचे बारवी क्षेत्रातील गावकरी सांगतात. आता मात्र त्यांचे दर्शन होत नाही.

बारवीच्या जंगलात एकेकाळी माऊस बीयर म्हणून परिचित असलेले पिसोरी जातीचे उंदरासारखे दिसणारे हरीण होते. काटेरी प्राणी म्हणून ओळखला जाणारा साळिंदरही बारवीच्या जंगलात दिसणे आता दुरापास्त झाले आहे. त्यासोबत कोल्हे, रानमांजर यांचाही वावर बारवीच्या जंगलात कमी झाला आहे. घोरपड, अजगर, नाग, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राणांच्या संख्येवरही परिणाम झाल्याचे येथे अभ्यास करणारे टिटवाळ्याचे उल्हास संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे सदस्य सांगतात. येथील मासले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या काही तलावांमध्ये अनेक प्रकारचे मासे, बदक आढळत असत. मात्र तलावांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक जातींसह पिंकटेल आणि शावलर जातींचे पाहुणे बदकही येथे येण्याचे बंद झाले आहेत. काही वर्षांपूर्वी एक शहामृगांचा कळप बारवीच्या जंगलात आढळल्याची नोंद आहे. मात्र बाहेरून हे सोडून गेल्याची शक्यता यात वर्तवण्यात येते.

बारवी धरणक्षेत्रात आणि आसपासच्या तलावात काही माशांचे प्रकारही आढळत होते. मरळ, महाथिर, मिंग अशा माशांच्या उपलब्धतेचा उल्लेख अनेक गॅझेटमध्ये करण्यात आला होता. मात्र सध्या या जाती जवळपास नामशेष झाल्या आहेत. त्याला शासनही काही अंशी जबाबदार असल्याचे बोलले जाते. नैसर्गिक जलसाठय़ामध्ये असलेल्या स्थानिक माशांच्या जाती संपविण्यात शासकीय धोरणही कारणीभूत ठरले आहे. तिलापिया नावाचा मासा पाण्यात सोडल्याने स्थानिक माशांना तो कर्दनकाळ ठरल्याचे उल्हास संग्रहालय आणि संशोधन केंद्राच्या अभ्यासात समोर आले आहे. त्यात शोभेचे, उपयोगी नसलेले मासेही अशा जलसाठय़ात सोडल्यानेही स्थानिक माशांवर परिणाम झाल्याचे बोलले जाते.

या सर्व बाबींवर प्रकाश टाकल्यानंतर बारवी जंगलाचे प्रभावीपणे संवर्धन करण्याची गरज आता व्यक्त केली जाते आहे. बारवीच्या जंगलातील ४२५ हेक्टर जमीन १९५७ मध्ये महसूल विभागाकडे वळवण्यात आली होती. त्या जमिनीवर अद्याप काही झालेले नाही. मात्र या जागेवर मनुष्य प्राण्यांचा अधिवास झाल्यास त्यामुळे येथील निसर्गसंपन्नतेला त्याचा धोका पोहोचण्याची दाट शक्यता पर्यावरणप्रेमी व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे ही महसुली जमीन वनक्षेत्रात बदलण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रानगव्याच्या वास्तव्यामुळे आजही बारवी ते आसपासच्या अभयारण्यांतून प्राण्यांचा प्रवास होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तानसा आणि बारवी जंगल क्षेत्रामधील हरित पट्टा संवर्धित करण्याची गरज आहे. बारवी जंगलात मोडणाऱ्या मासले ग्रामपंचायतीने गेल्या वर्षांत एक ऐतिहासिक ठराव केला. त्यात बारवी परिसर केंद्र सरकारच्या जैवविविधता २००२ नियमानुसार जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून जाहीर करावे असे नमूद करण्यात आले आहे. तसेच येथे सोडल्या जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करून त्याची वैद्यकीय तपासणी करूनच ते जंगलात सोडले जावे त्यासाठी नियम करण्याची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली होती. जंगलात असलेल्या आणि बाहेरून येणाऱ्या प्राण्यांचा एकमेकांवर परिमाण होऊ  नये यासाठी हा विधायक विचार ग्रामस्थांनी मांडल्याने पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जाते आहे. मात्र त्यावर शासनानेही भूमिका घेणे गरजेचे आहे.

सागर नरेकर