डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयात शिकत असतानाच बालनाटय़ स्पर्धामध्ये सहभाग घेतलेली अभिनेत्री खुशबू तावडे हिला खरे तर हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची इच्छा होती. हॉटेल मॅनेजमेंट करिअर तिने सुरूही केले. परंतु, अभिनयाची आवड पुन्हा जागृत झाली आणि त्याच दरम्यान निरनिराळ्या ऑडिशन्स खुशबू देत राहिली. त्यामधून टीव्ही मालिकांमध्ये छोटय़ा छोटय़ा भूमिका तिला मिळत गेल्या. सह्य़ाद्री वाहिनीवरच्या ‘कावळ्याच्या तोंडात पुरी’ या मालिकेत ती पहिल्यांदा झळकली. बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘प्यार की एक कहानी’, ‘तेरे लिए’ या हिंदी मालिकांमध्येही तिने भूमिका केल्या. ‘धर्मकन्या’ या मालिकेद्वारे पहिल्यांदा तिला पूर्ण लांबीची प्रमुख भूमिका २०१० साली मिळाली. त्यानंतर ‘एक मोहोर अबोल’मधली ‘मोहोर’ तिने साकारली. ही भूमिकाही गाजली. सध्या ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकाच्या नव्या संचात खुशबू प्रमुख भूमिकेत आहे.
* आवडते मराठी चित्रपट – लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांचे सर्व चित्रपट. परंतु, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ हे त्यांचे चित्रपट विशेष आवडले.
* आवडते हिंदी चित्रपट – ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘बॉम्बे टॉकीज’
* आवडती नाटकं – ‘ऑल दी बेस्ट’ पहिल्या संचातील, ‘सही रे सही’
* आवडते दिग्दर्शक – इम्तियाज अली, उमेश कुलकर्णी
* आवडलेल्या मालिका – ‘४०५ आनंदवन’, इंग्रजीतील ‘फ्रेंड्स’ मालिका
* आवडलेल्या भूमिका – ‘सदमा’ चित्रपटातील श्रीदेवीची भूमिका
* आवडते सहकलावंत – नीलेश साबळे ‘एक मोहोर अबोल’, टायमिंग सेन्स
* आवडते लेखक – मिलिंद बोकील, सुधा मूर्ती
* आवडलेली पुस्तकं – ‘द मॉन्क हू सोल्ड हीज फरारी’, ‘द सिक्रेट’, चंद्रशेखर गोखले यांचे ‘मी माझा’
* आवडता खाद्यपदार्थ – वरणभात-तूप
* आवडता फूडजॉईण्ट – डोंबिवली पश्चिम येथील ‘मुनमून’
* आवडते हॉटेल – डोंबिवली पूर्व येथील ‘नंदी पॅलेस’
* ठाणे जिल्ह्यातील आवडता पिकनिक स्पॉट – येऊर
डोंबिवलीविषयी थोडेसे – जन्मापासूनच डोंबिवली पश्चिम येथे राहतेय. त्यामुळे स्वाभाविकपणे मी अगदी अस्सल डोंबिवलीकर आहे. सुरुवातीपासूनच येथे राहत असल्यामुळे रेल्वेने दीड-दोन तास प्रवास करावा लागणार हे मी किंवा माझ्यासारख्या अनेक डोंबिवलीकरांनी गृहीत धरलेलेच असते. त्यामुळे त्याचा बाऊ करण्याचे काही कारण नाही. डोंबिवलीविषयी विशेष नमूद करायच्या गोष्टी म्हणजे डोंबिवलीत आपुलकीने राहणारी माणसं आहेत. एक प्रकारचे घरपण आणि गावपण डोंबिवलीकरांनी जपलेय असे जाणवते. सोयीसुविधांनी स्वयंपूर्ण असं डोंबिवली शहर आहे. शैक्षणिक आणि कलाविषयक भूक भागविणाऱ्या खूप गोष्टी इथे आहेत. डोंबिवलीकरांविषयी अन्य शहरांतील लोकांना आदर वाटतो हे समजल्यावर मला आनंद होतो. डोंबिवली आता मोठं शहर होत असलं तरी गावपण जपलंय असंही मला नमूद करावंसं वाटतं. सुधारणांचे विचाराल तर डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसी परिसरातील प्रदूषण रोखण्याची नितांत गरज आहे असे वाटते.