डोंबिवली: डोंबिवली येथील पूर्व भागातील नेहरु रस्ता, फडके रस्ता या वर्दळीच्या रस्त्यावरील दुतर्फाचे पदपथ दुकानदारांकडून सामान ठेऊन पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केले जात आहेत. पालिकेची अतिक्रमणे पथके या भागात तैनात असताना त्यांच्याकडून या दुकानदारांवर कारवाई होत नसल्याने पादचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
पदपथावर दुकानदारांकडून सामान ठेवले जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन येजा करावी लागते. एखाद्या नागरिकाने व्यापाऱ्याला सामान बाजुला घेण्यास सांगितेल तर दुकानदार आम्ही पालिकेला कर भरतो. ही जागा तुमच्या मालकीची आहे का, अशी उलट उत्तरे देतात, असे काही नागरिकांनी सांगितले. रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे पाहिजेत. एकाही पदपथावर फेरीवाला, दुकानदाराने सामान लावलेले खपवून घेऊ नका. त्या दुकान मालकावर तातडीने कारवाई करा, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांचे साहाय्यक आयुक्तांना आदेश आहेत. असे असताना फ प्रभाग अधिकाऱ्यांकडून पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या, रस्त्यांचे कोपरे अडवून फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> नोकरीच्या आमिषाने डोंबिवलीतील दोन महिलांची फसवणूक
संध्याकाळच्या वेळेत फेरीवाले रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौका समोरील पदपथ, दुकानांसमोर दुकाने थाटुन बसतात. तरीही फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी त्यांना हटविण्याची कार्यवाही करत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी फ प्रभागातील फेरीवाले हटाव पथकातील कामगारांवर कारवाई करण्याची आणि डोंबिवलीतील फ या महत्वाच्या प्रभागात शासन सेवेतील साहाय्यक आयुक्त नेमण्याची मागणी शहरातील जाणकार नागरिकांकडून केली जात आहे. पालिका अधिकाऱ्यांना संपर्क केला की मात्र कारवाई सुरू आहे, अशी उत्तरे दिली जातात. ग प्रभाग हद्दीत मात्र फेरीवाल्यांवर साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या आदेशावरुन फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांची जोरदार मोहीम सुरू असल्याने या प्रभागातील फेरीवाले गायब आहेत. ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर, पदपथ अडविणाऱ्यांवर पालिकेकडून नियमित कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.