डोंबिवली- दारुसाठी पैसे देत नाही म्हणून रागाच्या भरात एका दारुड्याने डोंबिवली जवळील पिसवली गावात एका ४४ वर्षाच्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली. संदीप पुंडलिक असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा- औरंगाबाद : जमीन मोजणी नकाशा दुरुस्तीसाठी मागितली ५० हजारांची लाच; भूमापकाविरोधात गुन्हा दाखल
रघुनाथ मस्तुद, पत्नी वैशाली आणि त्यांची दोन मुले पिसवली गावात श्रीहरी सोसायटी चाळीत राहतात. रघुनाथ हे भिवंडी जवळील बाटा कंपनीत कामगार आहेत. त्यांचा एक मुलगा निशान मस्तुद कोळसेवाडी वाहतूक विभागात वाहतूक सेवक आहे. एक मुलगा वडपा येथील औषध कंपनीत काम करतो.
पोलिसांनी सांगितले, रघुनाथ मस्तुद आणि आरोपी संदीप पुंडलिक अहिरे शेजारी आहेत. संदीपच्या घरात त्याचे आई, वडील असतात. संदीप हा सेंच्युरी रेयाॅन कंपनीत नोकरीला आहे. परंतु, त्याला दारुचे व्यसन आहे. तो दारुसाठी रघुनाथ मस्तुद यांच्या पत्नी, दोन्ही मुलांकडे पैसे मागत असतो. सुरुवातीला मस्तुद कुटुंब संदीपला पैसे देत होती. तो त्या पैशातून दारू पितो लक्षात आल्यावर वैशाली मस्तुद, त्यांच्या मुलांनी संदीपला पैसे देणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा राग संदीपला होता.
हेही वाचा- लग्नानंतरच्या काही दिवसांत नवरीचा पोबारा; इस्लामपूरच्या नवरदेवाची लाखोंची फसवणूक
पैशासाठी संदीप मस्तुद कुटुंबीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यावरुन वैशाली आणि संदीप यांच्यात भांडण होत होते. दारुसाठी मिळणारे पैसे बंद झाल्याने संदीप हा वैशाली मस्तुद यांचा राग करत होता. बुधवारी सकाळी रघुनाथ, त्यांची दोन्ही मुले कामावर गेली. रघुनाथ कंपनीतून पत्नीला मोबाईलवर संपर्क करत होते. त्यांची मुले संपर्क करत होती. ती प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यातून रघुनाथ यांना पत्नीची हत्या झाल्याचे समजले.
रघुनाथ, त्यांची मुले कामावर गेल्यानंतर संदीप अहिरे याने पत्नी वैशाली मस्तुद हिच्याकडे दारुसाठी पैशाची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न केल्याने संदीपने धारदार शस्त्राने रघुनाथ यांच्या पत्नीवर वार करुन तिला जीवे ठार मारले, अशी तक्रार पती रघुनाथ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संदीप अहिरे याला अटक केली आहे.