ठाणे : औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून भाच्यानेच एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश थोरात (२९) असे खंडणी घेणाऱ्याचे नाव असून तक्रारदार हे त्याचे नात्याने मामा आहेत. त्यांनी मंगेशला करारनाम्याची काही कागदपत्र दिली होती. ही कागदपत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे देणार असल्याचे धमकावून त्याने खंडणी उकळली होती. याप्रकरणात मंगेशला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा >>> कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कपोते वाहनतळ वाहनांसाठी सज्ज, प्रवाशांची मागील चार वर्षांपासूनची गैरसोय दूर
तक्रारदार हे ५९ वर्षीय असून ते एमआयडीसीमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी देखील एमआयडीसीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी देखील पदाचा राजिनामा दिलेला आहे. मंगेश थोरात याचे तक्रारदार हे नात्याने मामा लागतात. तक्रारदार यांच्या पत्नीने मंगेशला व्यवसाय करण्यासाठी ६१ लाख रुपये दिले होते. तसेच त्यांनी १ कोटी २५ लाख रुपये उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या पुनीत कुमार याच्याकडे देखील गुंतविले होते. पुनीत कुमार हा गुंतविलेले पैसे देत नसल्याने त्यांनी मंगेश थोरात याला ते पैसे काढून घेण्यास सांगितले होते. तसेच त्याबदल्यात त्याला काही पैसे दिले होते. तसेच पुनीत सोबत झालेला करारनामा आणि काही कागदपत्र दिली होती.
हेही वाचा >>> ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा सौरयंत्रणेवर सुरु
परंतु मंगेशने या करारनामा आणि कागदपत्रांचा गैरवापर करण्यास सुरूवात केली. त्याने तक्रारदार यांच्या पत्नीसोबत केलेल्या संभाषण जतन करत त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दाखल करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. तसेच त्याला दिलेले ६१ लाख रुपये मागू नये म्हणून आणखी एक कोटी रुपयांची मागणी त्याने केली. काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी मंगेश विरोधात खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार बुधवारी दुपारी नवी मुंबई येथे खंडणीची रक्कम घेताना मंगेश याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.