ठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सहा हजारहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून सुमारे ५७० कोटी ३० लाखाच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला नुकताच कामाचा कार्यादेश दिला आहे. हा प्रकल्प तत्परतेने कार्यान्वित करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी प्रकल्प अंमलबजावणी समितीची बुधवारी बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. या प्रकल्पामुळे शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले जाणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी नेहमीच गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेने पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. मागील काही वर्षांपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. बालक, महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सतत घडत असतात. तसेच सोनसाखळ्या चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारखेही प्रकार घडत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात ६ हजार ५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजुर झाला आहे. या कामासाठी पोलिसांनी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत मेसर्स श्री. सिद्धार्थ इन्फ्राटेक ॲण्ड सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि मेसर्स मॅट्रिक्स सिक्युरीटी ॲण्ड सर्व्हेलन्स प्रा. लिमिटेड या कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला असून त्यांना कामाचा कार्यादेश १० ऑक्टोंबरला देण्यात आला आहे. हा प्रकल्प तत्परतेने कार्यान्वित करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी प्रकल्प अंमलबजावणी समितीची बुधवारी बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना केल्या. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, भिवंडी निजामपुरा महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगांव – बदलापूर नगरपिरषदचे प्रतिनिधी, महावितरण विभागाचे प्रतिनिधी, ठाणे पोलीस सहआयुक्त , ठाणे अपर पोलीस आयुक्त पूर्व व पश्चिम प्रादेशिक विभाग, सर्व पोलीस परिमंडळीय पोलीस उपआयुक्त, ठाणे वाहतूक विभाग उपस्थित होते.
हेही वाचा – ठाणे : निराधार मुलांची “फिरती शाळा” बंद !
ह
कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य
यामध्ये स्थिर, वर्तुळाकार फिरणाऱ्या कॅमेऱ्यांचा समावेश असेल. तसेच दूरवरून आणि अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे देखील मुख्य चौकात बसविण्यात येणार आहे. वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेऱ्यांचाही सामावेश असेल. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडे असेल. तसेच ते नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा – ठाणे : एमटीएनएल इंटरनेट सेवा वारंवार ठप्पचा परिणाम शिधावाटप कार्यालयाच्या कामाकाजावर
कोणत्या भागात किती कॅमेरे
शहर ठिकाणे – सीसीटीव्हींची संख्या
ठाणे ते दिवा – ३,१६३
भिवंडी- १,३४७
उल्हासनगर ते बदलापूर – १,५४१
एकूण – ६,०५१