बदलापूर : शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात म्हात्रे यांची शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी म्हात्रे यांची पुन्हा शहरप्रमुखपदी निवड केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बदलापूर शहरप्रमुख पदी किशोर पाटील यांची निवड केली आहे. सामना या मुखपत्रातून या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे शहरात आता शिवसेनेचे दोन शहरप्रमुख झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिकांच्या आजी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होणे पसंत केले. त्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माजी २५ नगरसेवकांचाही समावेश होता. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक, ग्रामीण भागातील पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य अशा अनेकांचा त्यात समावेश होता. म्हात्रे यांच्या ठाकरे गटाला दिलेल्या पाठिंब्यानंतर बदलापूर शहरात शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येणारे लवकर दिसले नाहीत. काही काळानंतर अनेक जुन्या शिवसैनिकांनी, पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला होता.
त्यानंतर शिवसेनेच्या जुन्या आणि ज्येष्ठ पदाधिका्रयांनी शहरात येत निष्ठावंतांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर शिंगे गटाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींना पर्याय देऊन शहरात नवी उभारणी करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र नव्या नियुक्ती होत नव्हत्या. अखेर गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी हकालपट्टी करत असल्याचे मुखपत्रातून जाहीर केले होते. त्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून वामन म्हात्रे यांनी फेरनिवड केल्याचे जाहीर करत त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले होते.
त्यामुळे शहराला नव्या शहरप्रमुख द्यावा अशी मागणी निष्ठावंत शिवसैनि्कांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर गुरूवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून बदलापूर शहरप्रमुख पदी किशोर पाटील यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. किशोर पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून शहरात नव्याने शिवसेना उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी किशोर पाटील यांनी स्थानिक पातळीवर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे किशोर पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसते आहे.
मोठे आव्हान
गेल्या काही वर्षांपासून वामन म्हात्रे यांनी शिवसेनेला बदलापुरात एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. त्यांची शहरावर पकड आहे. असे असताना त्यांना आव्हान देणे नव्या पदाधिकाऱ्यांना जड जाण्याची शक्यता आहे. मात्र निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी फौज आमच्याकडे असल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून केला जातो आहे.