डोंबिवली – डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील संदप गावात अलीकडेच एमएमआरडीएच्या निधीतून सीमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. अनेक वर्षानंतर गावात काँक्रीटचा रस्ता झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मागील दोन दिवसांपासून काँक्रीटचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने फोडून तेथे जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या उलटसुलट कामांमुळे संदप मधील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संदप गावात तीव्र पाणी टंचाई आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात सीमेंट काँक्रीटचा रस्ता एमएमआरडीएच्या ठेकेदाराकडून बांधून पूर्ण झाल्यावर, आता गावात जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्या शिवाय दुसरी जागा नाही. जलवाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराने संदप गावातील सीमेंटचा नवाकोरा रस्ता जेसीबी आणि क्रॅकर मशिनच्या साहाय्याने फोडून टाकला आहे. रस्त्याचा काँक्रीटचा एक भाग पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्याने ग्रामस्थांनी ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप केला आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम गावात करायचे होते तर अगोदरच जलवाहिनीचे काम का करण्यात आले नाही, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
यासंदर्भात ग्रामस्थांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. गावातील नवीन कोऱ्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची जलवाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या वाताहतीची माहिती दिली. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांंनी यासंदर्भात पालिका आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून संदप गावातील नवीन कोरा काँक्रीटचा रस्ता तोडण्यासाठी संबंधिताने पालिका, एमएमआरडीए, वाहतूक विभागाची परवानगी घेतली होती का. काँक्रीटचा नवीन रस्ता फोडून करदात्यांची पैशांची उधळपट्टी यामाध्यमातून करण्यात आली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम संदप गावात करायचे होते तर मग अगोदर जलवाहिनी टाकण्याचे काम का करण्यात आले नाही. काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हे काम हाती घेऊन रस्त्याची वाताहत का करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी उत्तर देण्याची मागणी जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी केली आहे.
संदप गावातील काँक्रीटचा रस्ता आहे तसाच पुन्हा करून देण्यात आला नाहीतर ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दोन्ही प्रशासनांना दिला आहे. अधिक माहितीसाठी एमएमआरडीेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांंनी हे काम एमएमआरडीएचे असल्याचे सांगितले.
ठाकुर्लीत गोंधळ
ठाकुर्लीत स्मशानभूमी रस्ता ते विठाई बंगला दरम्यान काँक्रीट रस्त्याचे काम एमएमआरडीए ठेकेदाराने सुरू केले आहे. हे काम करताना रस्त्यात पाच झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्याची पालिकेच्या उद्यान विभागाकडून परवानगी न घेताच ठेकेदाराने झाडांच्या भोवती सीमेंट काँक्रीट टाकून रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याने मात्र रस्ते ठेकेदाराने पालिकेला न कळविता हे काम हाती घेतले. त्यांना लवकरच झाडांसंदर्भात निर्णय घेऊन परवानगी दिली जाईल, असे सांगितले.