जलतज्ज्ञांचे मत; कुकांबे नाल्यात अजूनही लाखो लिटर जलसाठा

वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक रचनेमुळे ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांत कमीत कमी खर्चात अनेक लहान-मोठी धरणे बांधता येणे शक्य आहे. वन विभागाने शहापूर तालुक्यातील भातसानगर-बिरवाडी भागातील कुकांबे नाल्यावर बांधलेल्या काँक्रीटच्या बंधाऱ्याने हे सिद्ध केले आहे. दोन वर्षांपूर्वी बिरबाडी, भातसानगर जवळील कुकांबे येथील नाल्यावर वन विभागाने हा बंधारा बांधला. त्यामुळे एरवी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरडा होणारा हा जलप्रवाह आता एप्रिलच्या मध्यावरही दुथडी भरून वाहतो आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील जनावरांना पाणी मिळू लागले आहे. या नाल्याच्या प्रवाहात पुढे खोल दरी असून तिथे सहजपणे एखादे धरण बांधणेही शक्य आहे. प्रवाहाच्या तीराला कुठेही वस्ती नसल्याने कुणीही विस्थापित न होता इथे कोटय़वधी लिटर पाणी साठू शकेल.

त्यामुळे ‘शाई’ अथवा ‘भावली’च्या नादी न लागता सहजशक्य, सोपे आणि तुलनेने कमी खर्चाचे असे जलप्रकल्प शासनाने हाती घ्यावेत, असे मत जलतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

माणसांना प्यायला पाणी नाही, तिथे गुरांना कोण पाणी देणार. त्यामुळे शहापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता आपली गुरे सोडून दिली आहेत. त्यातील अनेक गुरे पळवली जातात. शहापूरमधील बिरवाडी, भातसानगर परिसरातील कुकांबे, प्रधान पाडा, नावूचा पाडा, चौकीचा पाडा, रातांधळे आदी गाव-पाडय़ांतील शेकडो जनावरे दररोज इथून तब्बल पाच किलोमीटर दूरवर दरीत असलेल्या भातसा नदीवर पाणी पिण्यासाठी जात होती. मात्र दोन वर्षांपूर्वी वन विभागाने कुकांबे येथे नाल्यावर सिमेंटचा बंधारा बांधला. परिणामी आता एप्रिल महिन्याच्या मध्यावरही या नाल्याला भरपूर पाणी आहे. त्यामुळे गुरा-ढोरांचा पाण्याचा प्रश्न मिटून त्यांची वणवण संपली आहे.

याच नाल्यावर अन्य काही बंधारे बांधले तर एका छोटय़ा धरणाएवढे पाणी सहज साठू शकेल.

शिवाय पुढे कोणतीही वस्ती नसल्याने विस्थापनाचा प्रश्नही येणार नाही. त्यामुळे शासनाने या ठिकाणी धरण बांधण्याबाबत विचार करावा, असे आवाहन देवराम तुमने या स्थानिक ग्रामस्थाने केले आहे.

केवळ एका बंधाऱ्याने कुकांबे नाल्यात लाखो लिटर पाणी साचले आहे. या नाल्यावर आणखी काही बंधारे बांधले तर फार मोठा जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील पशू, पक्ष्यांची सोय होईलच, शिवाय नाल्यालगत असलेल्या अनेक टंचाईग्रस्त गावांनाही पाणी मिळू शकेल. 

– एन. कोकरे, वनाधिकारी

Story img Loader