ऑनलाइन बाजारातील कल्पक राख्यांना पसंती   

भावाबहिणीच्या नात्याचा सुंदर आविष्कार म्हणजे राखी पौर्णिमा. काळ कितीही बदलला तरी श्रावण महिन्याच्या मध्यावर येणाऱ्या या सणाचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. दरवर्षी नव्या, आकर्षक पद्धतीच्या राख्या बाजारात येऊन या सणाचे माहात्म्य वाढवीत असतात. यंदा या नात्याला शब्दधाग्यांत गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  या नव्या पद्धतीच्या राख्या घरबसल्या ऑनलाइन खरेदी करण्याचीही सोय उपलब्ध आहे. चष्मा, मिशा, कॅमेरा, व्हिडीयो गेम यांसारख्या भाऊरायाला संबोधित करणारे चिन्ह वापरून त्यावर ‘बडम भाई’, ‘छोटा भाई’, ‘प्यारा भाई’, ‘स्वॅगवाला भाई’ असे शब्द कोरलेल्या अनेक राख्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यावर सध्या या ‘शब्दरेखा’ बऱ्याच लोकप्रिय आहेत.

आधुनिक रक्षाबंधनाचा हा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन खरेदी या साध्या सोप्या पद्धतीमुळे उपलब्ध असलेल्या सर्वच कंपन्यांनी ई-राखी ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तूंचे नानाविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही ऑनलाइन खरेदीच्या संकेतस्थळावर जाऊन ई-राखी असा शोध घेतल्यास या राख्यांचे आणि भेटवस्तूंचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. उपलब्ध पर्यायांमध्ये आवड-निवड आणि बजेटनुसार खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत. अशी राखी पसंतीस आल्यानंतर आपण ती बुक करून ज्यांना पाठवायची आहे अशा व्यक्तीचा नाव पत्ता दिला की झाले.

शब्दराख्या

तरुणाई नेहमीच काहीतरी वेगळे आणि नवीन करण्यासाठी उत्सुक असतात. नवी स्टाइल, नवे ढंग त्याचबरोबर नवे शब्दही ते स्वत: करतात. महाविद्यालयीन तरुणांमध्ये यो, स्व्ॉग, ब्रो असे काही शब्द तरुणांकडून आवर्जून ऐकायला मिळतात. यंदा याच शब्दांच्या राख्यांनी ऑनलाइन बाजार सजलेला पाहायला मिळत आहे. यंदा मेटालिक (धातूच्या) राख्यांमध्ये असे विविध शब्द वापरून आकर्षक राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या राख्यांचे वैशिष्टय़ म्हणजे या ब्रेसलेटसारख्याही वापरता येऊ शकतात. तसेच बरेच जण की-चेन किंवा पेण्डण्ट म्हणूनही त्याचा वापर करतात.

Story img Loader