ठाणे : एप्रिल महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात परिक्षेचा हंगाम संपतो. परिक्षा संपल्यावर मुलांच्या सुट्टीच्या काळात मनोरंजन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध संस्थांद्वारे उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा शिक्षण विभागाने लागू केलेल्या परिपत्रकानुसार, शाळांमधील परिक्षा संपून शाळा सुरू राहिल्याने शहरातील उन्हाळी शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यातुन मार्ग काढत, काही शिबिरांचे आयोजन एप्रिल अखेरीस तर काही शिबीरे मे मध्ये होणार असल्याचे संस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे. यामध्ये उष्णतेचा विचार करूनच शिबीरांची ठिकाणे ठरवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांच्या आवडीचा काळ. या काळात मुल मित्रमैत्रीणींसोबत खेळ खेळणे, गावी फिरायला जातात. त्याचप्रमाणे या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक संस्था उन्हाळी शिबीरे आयोजित करीत असतात. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना विविध कला, खेळ आणि उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने ठाणे शहरातील काही शाळा तसेच संस्था या शिबिरांचे आयोजन करतात. मात्र, परीक्षा होऊनही शाळा सुरू असल्याने उन्हाळी शिबीरे आयोजित करायची कधी असा प्रश्न संस्थांपुढे होता. याचा विचार करून काही संस्थांनी उन्हाळी शिबिरांच्या वेळापत्रकातच बदल केल्याचे दिसून आले.

दरवर्षीनुसार एप्रिलच्या सुरुवातीस किंवा मध्यानंतर होणारी या शिबिरांनी यंदा एप्रिल अखेर तर मे महिना गाठल्याचे दिसून आले. यामध्ये शहरातील वनशक्ती संस्थेच्यावतीने एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ६ ते ७ दिवसांचे निसर्ग भटकंतीचे शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिबिर मानपाडा येथे होणार आहे. यामध्ये ७ ते १४ वयोगटातील मुलांना प्राणी, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांवर आधारीत माहिती दिली जाणार आहे. तसेच बागकाम कार्यशाळेमध्ये झाडे लावण्याचे तंत्र, पर्यावरणीय खेळ, वारली चित्रकला, मातीकाम कार्यशाळा अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मावळी मंडळ संस्था, चरई, ठाणे यांच्यावतीने गोष्टी सांगणे, मैदानी खेळ असे विविध उपक्रम असणार आहेत. हे शिबीर १९ एप्रिल पासून ३० एप्रिल या कालावधीत सकाळी ८.३० ते ११.३० च्या दरम्यान असणार आहेत. यामध्ये तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा सहभाग असणार आहे.

ठाणे येथील ए के जोशी शाळेत देखिल उन्हाळी शिबीरे असणार आहेत. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार ते पाच भाषांमध्ये संगीत शिकविले जाणार आहे. या संगीताला अभिनयाची देखिल जोड असणार आहे. तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देखिल जाणार आहे. तर तंत्रज्ञानाशी जोडून ठेवण्यासाठी संगणकीय शिक्षण दिले जाणार आहे. हे शिबीर १४ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत ८.३० ते ११. ३० यावेळेत असणार आहे. तर , प्राथमिकच्या विद्यार्थ्यालाठी १४ एप्रिल ते २५ एप्रिल मध्ये रांगोळी, अग्नीशिवायचे अन्न शिजवणे, संगीत, असे विविध उपक्रम असणार आहेत.

दरवर्षी एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा शिबीरे मे महिन्यात ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र मे मध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवते. त्यामुळे उष्णता लक्षात घेऊन निसर्गरम्य ठिकाणी अथवा सोसायटी मध्ये यंदाचे शिबीर भरवावे लागणार आहे.सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे