ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील सीपी तलाव भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यावरून वाद रंगला असतानाच, याच परिसरातील बुश कंपनीच्या जागेवर पालिकेने गुरूवारी कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्यासह स्थानिकांनी विरोध केल्यानंतर पालिकेने कचरा वाहने माघारी नेली. तसेच या परिसरात दुसरी कचरा भुमी होऊ देणार नसल्याचा इशारा देत सीपी तलाव येथील कचरा हटविण्याची मागणी प्रकाश शिंदे यांनी केली आहे. यामुळे कचरा टाकायचा कुठे असा पेच पालिकेसमोर उभा राहिला असून त्याचबरोबर शहरात कचरा समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे पालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. स्थानिकांच्या विरोधानंतर पालिकेने शहराबाहेर भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात कचराभूमी उभारली. मात्र, डायघर प्रकल्प कार्यान्वित होताच पालिकेने भंडार्ली कचराभुमी बंद केली. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातून संकलित केलेला कचरा सुरुवातीला सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर नेला जातो. येथून तो कचरा पुढे डायघर कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या ठिकाणी नेला जातो. परंतु डायघर प्रकल्प गेले अडीच महिने बंद असल्यामुळे सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागले असून येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच दहा दिवसांपुर्वी येथे कचराभुमीला आग लागून परिसरात धुर पसरला. यानंतर स्थानिकासह शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. त्यानंतर पालिकेने ही कचराभुमी बंद करण्यात आली असून यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील सीपी तलाव भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यावरून वाद रंगल्याचे चित्र आहे. असे असतानाच, पालिकेने याच परिसरातील बुश कंपनीच्या जागेवर गुरूवारी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी पालिकेने कचरा टाकण्यासाठी ७५ ते १०० वाहने आणली होती. मात्र, ही बाब कळताच, स्थानिकांसह माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी धाव घेऊन तिथे कचरा टाकण्यास विरोध केला. या विरोधानंतर पालिकेने कचरा वाहने माघारी नेली. याठिकाणी पुन्हा कचरा आणू नका असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिला.
वागळे इस्टेट परिसरातील सीपी तलाव येथे एक कचरा भुमी असून त्यास नागरिकांचा विरोध आहे. तरीही पालिकेने याच भागातील बुश कंपनीच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी ७५ ते १०० कचरा गाड्या आणल्या होत्या. आधीच एका कचराभुमीचा नागरिकांना त्रास होत असताना दुसरी कचराभुमी उभारल्यास नागरिकांना जास्त त्रास होईल. त्यामुळे येथे कचरा भूमी उभारण्यास आमचा विरोध असून सीपी तलाव येथील कचरा पालिकेने उचलून आतकोली येथे न्यावा, अशी मागणी प्रकाश शिंदे यांनी यावेळी केली. तसेच नऊ प्रभाग समिती स्तरावरच त्या त्या प्रभागातील कचरा विल्हेवाटीसाठी नियोजन केले तर, त्यातून काहीतरी मार्ग निघेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.