गुजराती पदार्थ म्हटले की सर्वसाधारणपणे गोड चवीचे पदार्थच डोळ्यासमोर येतात, परंतु गुजरातच्या विविध पदार्थामध्येही मसालेदार आणि तिखट पदार्थ अशी ओळख आहे ती म्हणजे काठेवाडी पदार्थाची. अस्सल काठेवाडी पदार्थाची चव चाखायला मिळते ती काठेवाडी धाब्यावरच. मीरा रोडमध्येही असाच एक काठेवाडी धाबा सुरू झाला आहे. त्यामुळे तिखट खायची आवड असणाऱ्यांनी या काठेवाडी धाब्याला एकदा तरी जरूर भेट द्यावी.

काठेवाड हा पश्चिम गुजरातमधल्या सौराष्ट्राचा एक भाग. थंडीमध्ये या ठिकाणी तापमान अतिशय कमी असते, म्हणूनच येथील पदार्थामध्ये मसाल्याचा वापर अधिक होतो आणि ते तिखट केले जातात. काठेवाडी पदार्थामध्ये लसूण आणि कांद्याचा मुबलक वापर केला जातो आणि ताक हे प्रत्येक पदार्थासोबतचा अविभाज्य घटक असते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी मीरा-भाईंदर रस्त्यावरील जुन्या पेट्रोल पंपाजवळ अमराम यांनी काठेवाडी ढाब्याची सुरुवात केली. तिखटपणा हा काठेवाडी पदार्थाचा स्थायिभाव असला तरी मीरा रोडच्या काठेवाडी ढाब्यातील पदार्थ मात्र शहरातील नागरिकांच्या तब्येतील झेपतील इतपतच तिखट असतात. काठेवाडी पदार्थामधला रस्सा हा बेसन, कांदा, लसूण आणि टोमॅटोचा वापर करून तयार केला जातो. काठेवाडी मसाले हेही वैशिष्टय़पूर्ण असतात. अमराम हे काठेवाडी मसाले खास डोंबिवलीहून मागवतात. आलू लसनीया, आलू रजवाडी, भरता काछी दही, उंधियो हे खास काठेवाडी पदार्थ प्रसिद्ध आहेत.

‘आलू लसनीया’मध्ये अख्खे बटाटे न कापता आतून पोकळ केले जातात. आतमध्ये काठेवाडी मसाला स्टफ करून त्याला अख्ख्या लसणाची फोडणी दिली जाते आणि मग खास पद्धतीने तयार केलेल्या काठेवाडी रश्शात ते शिजवले जातात. आलू रजवाडी हा पदार्थही काहीसा असाच तयार केला जातो, परंतु यात अख्खा बटाटा न वापरता बटाटय़ाच्या मोठय़ा फोडी केल्या जातात (मराठी पदार्थामधील बटाटय़ाच्या भाजीप्रमाणे) आणि मग काठेवाडी रश्शात या फोडी घालून भाजी तयार केली जाते.

भरता काछी दही म्हणजे वांग्याचे भरीत, परंतु यात वांग्याचे भरीत तयार केल्यानंतर त्यात दही घातले जाते की तयार होते भरता काछी दही. उंधियो हा सर्वात लोकप्रिय असा काठेवाडी पदार्थ आहे. वांगे, बटाटा, वालपापडी आणि विविध कंदमुळांपासून उंधियो तयार होतो, परंतु उंधियो हा थंडीच्या- विशेष करून डिसेंबर- महिन्यात खाण्याची पद्धत आहे त्यामुळे मीरा रोडच्या काठेवाडी ढाब्यात तो याच दिवसात मिळतो.

काठेवाडी थाळीला या ठिकाणी सर्वाधिक पसंती आहे. दोन भाज्या, डाळ भात आणि रोटी असा साधा मेन्यू काठेवाडी थाळीचा आहे, परंतु काठेवाडी मसल्यांनी हा साधा बेतही चविष्ट लागतो. नेहमीच्या चपात्यांव्यतिरिक्त बाजरी, ज्वारी आणि मक्याची रोटी हेही येथील वैशिष्टय़ आहे. याशिवाय शेव कांदा, कढी खिचडी, मेथी बेसन, शेव टमाटर, भरली वांगी, आलू बैंगन आदी काठेवाडी पदार्थही तितकेच चवदार आहेत. काठेवाडी पदार्थासोबतच गट्टे की सब्जी, दाल बाटी, लसून सब्जी आदी पदार्थही या ठिकाणी उपलब्ध आहेत. स्वस्त आणि मस्त अशा काठेवाडी पदार्थाची लज्जत चाखायला काठीयावाडी ढाब्यात जायलाच हवे.

न्यू काठीयावाडी ढाबा

  • शॉप क्र. ६, न्यू श्रीनाथ कॉम्प्लेक्स, दीपक रुग्णालयासमोर, मीरा-भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व)
  • वेळ – सकाळी ११ ते ३ आणि सायंकाळी ७ ते १०.