ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘किट’ लवकरच बाजारात
हल्ली जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये भेसळ केली जात असल्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यातही दूध, तूप, मावा अशा दुग्धजन्य पदार्थामधील भेसळीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, सहज डोळय़ांनी दिसत नसल्याने ही भेसळ सर्वसामान्यांना ओळखता येत नाही. याच पाश्र्वभूमीवर ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘इझी मिल्क टेस्टिंग केमिकल किट’ तयार केले असून या किटच्या माध्यमातून दूध आणि तूप या पदार्थाखेरीज हळद, मसाले, चहा पावडर अशा अनेक जिन्नसांतील भेसळ सहज ओळखता येणे शक्य होणार आहे.
‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत काम करणारे गजानन पाटील यांचे एक व्याख्यान बांदोडकर महाविद्यालयात झाले होते. त्यातून येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भेसळ ओळखणारे विशिष्ट रसायन तयार केले. बांदोडकर महाविद्यालयातील २० ते ४० जणांच्या चमूने अन्न भेसळीचे पितळ उघड करणारी ही पद्धत शोधली आहे. आयोडिन, लिंबू, खाद्य सोडा, अल्कोहोल आदी १२ प्रकारचे घटक वापरून हे कीट तयार केले आहे. आतापर्यंत एकूण शंभर किट विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. आणखी किट बनविण्यात येत आहेत. अन्नभेसळ शोधणारे हे किट संपूर्ण राज्यभर वितरित केले जाणार असून त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन आता कर्नाटक राज्यानेही ते मागवले आहे.
सर्वसाधारण व्यक्तींना रसायनांची नावे माहिती नसतात. त्यामुळे किटमधील रसायनांच्या बाटल्यांना सी १ ते सी १२ अशी सोपी नावे देण्यात आली आहेत. ५ मिलीलिटर दुधामध्ये सी १ चे तीन थेंब टाकल्यास दुधाचा रंग निळा झाला तर त्या दुधात पिठाची भेसळ केली आहे हे कळणार आहे. तसेच ५ मिलीलिटर दुधात ३ थेंब सी ७ आणि चार थेंब सी ८ चे टाकल्यास दुधाचा रंग लाल-गुलाबी झाल्यास या दुधात सोडा असल्याचे कळते. त्याचप्रमाणे वनस्पती तुपात आयोडिनचा १ थेंब टाकल्यास त्याचा रंग काळसर-तपकिरी झाल्यास त्यात उकडलेल्या बटाटय़ाचा किस टाकल्याचे लक्षात येणार आहे. शुक्रवारी, २९ एप्रिल रोजी कळव्यातील जानकीबाई रमा साळवी महाविद्यालयात अन्न विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या हस्ते या किटचे उद्घाटन होणार आहे.
भेसळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी केमिकल किटच्या डब्यावर एक टोल फ्री क्रमांक लिहिण्यात आला आहे. या किटची किंमत २५० रुपयांपासून ५०० रुपयापर्यंत असल्याची माहिती रोहित चतुर्वेदी या विज्ञान शाखेत तृतीय वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने दिली. घरच्या घरी या किटचा वापर होईलच. शिवाय हॉटेल्स, दूध डेअरी, उपाहारगृह, विविध सामाजिक संस्था, दवाखाने आदींसाठी हे किट उपयुक्त ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा