हल्ली कोणतीही गोष्ट साजरी करताना काही तरी वेगळे करावे असे सगळ्यांना वाटते. गेल्या काही वर्षांत सेलिब्रेशन संस्कृती वेगाने वाढीस लागल्याने आकर्षक सजावट, जास्तीत जास्त सुखसोयी पुरवणे, या मुद्दय़ांवर विशेषत्वाने भर दिला जातो. बाजारात तर अगदी तयार आमंत्रणापासून आकर्षकरीत्या पॅक केलेल्या रिटर्न गिफ्टपर्यंत सगळे पर्याय विविध स्वरूपांत उपलब्ध आहेत. अधिकाच्या हव्यासापायी आपण इतक्या गोष्टी घेत राहतो, वापरत राहतो, की कुठे तरी अधिक कचरा आणि अधिक प्रदूषण असे त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत, या गोष्टीचा कुठे तरी विसर पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच संस्थेने या दृष्टीने जागरूकपणे पाऊल उचलीत ठाणेकरांना नव्या स्वरूपातील, नव्या रंगातील सेलिब्रेशनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ठाण्यातील प्लॅस्टिक कचरा याविषयी जाणून घेतल्यास रोज ९०,००० किलो कचऱ्यापैकी ११,००० किलो कचरा हा फक्त पॅकिंग आणि सवर्ि्हग स्वरूपाचा आहे आणि त्याची रवानगी सध्या तरी डंपिंग ग्राऊंडवरती होत आहे. म्हणून याविषयी ठाणेकरांनी जागरूक होऊन आपापल्या परीने छोटे छोटे बदल करीत पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल या दृष्टीने हातभार लावणे गरजेचे आहे. पूर्णत: पर्यावरणपूरक जीवनशैली तरी अंगीकारणे, सध्याची जीवनपद्धती संपूर्णपणे बदलणे हे हळूहळूच शक्य होणार आहे. म्हणूनच लहान मुलांवर लहान वयात पर्यावरण जतन संवर्धनाचे संस्कार कृतीतून करण्यावर संस्थेने सातत्याने भर दिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक पद्धतीने समारंभ साजरे करणे हा संस्थेचा एक अभिनव उपक्रम आहे. पर्यावरणपूरक समारंभ साजरे करताना निसर्गापासून लांब गेलेल्या माणसाला निसर्गाच्या सान्निध्यात आणून, काही काळ निसर्ग अनुभवण्याचा (शहरी गोंधळ, धावपळ याचा विसर पडावा), निसर्गाशी जोडण्याचा, समारंभाचा असा वेगळा अनुभव देण्याचा, हा एक कळकळीचा प्रयत्न आहे. अशा तऱ्हेने काही काळ निसर्गात व्यतीत केल्यावर कुठे तरी निसर्गाविषयी आत्मीयता वाटायला, संवेदनशील होण्यास सुरुवात होईल, असाही विचार यामागे आहे. या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मुले हे नवे बदल लवकर स्वीकारतात, त्या दृष्टीने स्वत:मध्ये जागरूकपणे बदल करण्यास ते उत्सुक असतात, सजग असतात असे दिसून येते. म्हणून मुलांसाठी वाढदिवस, शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दलचे गेटटुगेदर इ. छोटय़ा समारंभांच्या आयोजनासाठी संस्थेने पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

जर (समारंभ) वाढदिवस निसर्गाच्या सान्निध्यात करायचा असेल, तर येऊरला घेऊन जाण्यापासून वाढदिवसाची संपूर्ण जबाबदारी (आयोजनाची ज्यामध्ये वाहन व्यवस्था, मुलांसाठी खेळ, खाऊ, केक, रिटर्न गिफ्ट इ. गोष्टींचा समावेश आहे.) संस्थेतर्फे घेतली जाते; पण त्यासाठी कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० जण अपेक्षित आहेत.  बसने समारंभात सामील असलेल्यांना येऊरला निसर्ग अनुभवायला नेण्यात येते. त्यासाठी खास जागा निवडण्यात आली आहे. सिमेंटच्या जगात राहणाऱ्या, मोकळ्या मैदानावर खेळायला मुकलेल्या मुलांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव प्रवासापासूनच असतो. संपूर्ण आयोजनात पर्यावरण जतन संवर्धनास प्राधान्य देताना पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल याबाबत कटाक्ष असतो. ५० लोकांसाठी काही गाडय़ा जाण्याऐवजी एकच बस वापरली जाते. थर्माकोल, प्लॅस्टिक इ. गोष्टींनी सजावट करण्यात इथे पूर्णपणे मज्जाव आहे. निसर्गाच्या सान्निध्यातच वावरायचे, निसर्ग अनुभवायचा, नैसर्गिक आवाज, रंग, काही हालचाली, फुले-पाने अनुभवायची हा प्रयत्न असतो. कारण ९ ते २ वेळ ही मुद्दामच निवडण्यात आली आहे. सुरुवात एखाद्या हलक्याफुलक्या गमतीदार खेळाने होते आणि मग त्यानंतर दोन साहसी खेळ, खजिन्याचा शोध असे खेळ ज्यातून निसर्गाशी थोडीफार जोडली जावीत हा प्रयत्न असतो. मुलांना स्वत:पुरते पिण्यासाठी पाणी आणायला सांगितले जाते, कारण विकतच्या बाटलीतील पाणी इथे दिले जात नाही.  वाढदिवसासाठी जो केक असतो तोदेखील स्त्रियांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या समाजसेवी संस्थेकडून घेतला जातो. केक हा फळांचा वापर केलेला, कमीत कमी व्हिपिंग क्रीमचा उपयोग केलेला (बेकिंग टाइमही कमी ज्यामुळे वीज बचत होते) असा असतो. खाण्याचे पदार्थदेखील पौष्टिक गटात मोडणारे, आपल्या मातीशी नाते सांगणारे असे, पण तरीही मुलांना आवडतील असे असतात. यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. मुलांना खायला देताना सुपारीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या प्लेट्स, बाऊल आणि पाणी पिण्याच्या स्टीलच्या भांडय़ाचा वापर केला जातो. या बशा, बाऊल धुऊन परत वापरता येतात. आपल्याकडे आलेल्यांना छोटीशी भेटवस्तू दिल्याशिवाय समारंभाची सांगता होत नाही. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अखेरीस मुलांना छोटी औषधी रोपे किंवा जास्वंदीचे रोप दिले जाते; पण इथे मुलांना रोप मातीत कसे लावायचे त्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.

येऊरला जायचे नसेल, तर संस्थेचे कार्यकर्ते घरी येऊन संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारतात. अशा तऱ्हेने लहान मुलांचे वाढदिवस, पार्टी (अर्थात मोठय़ांसाठीदेखील) पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याच्या या अभिनव उपक्रमास प्रारंभ झाला आहे.  पर्यावरण जीवनशैली अंगीकारणे ही काळाची निकड आहे. या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने खारीचा हातभार लावणे ही काळाची निकड आहे. या दृष्टीने लहान मुलांवर पर्यावरण जतन संवर्धनाचे संस्कार केल्यास ही पिढी आपापली जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करेल याबद्दल शंका नाही.