ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणूकीचा आढावा घेण्याचे काम नवे पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी सुरू केले आहे. त्यात नागरिकांना योग्य वागणूक मिळाली नसल्याचे आढळून येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करीत आहेत. यामुळे नव्या पोलीस आयुक्त डुम्बरे यांच्या दट्ट्यामुळे सुस्त असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात. आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळे असून त्यात एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. तसेच वाहतूक शाखेची एकूण १८ युनीट आहे. शिवाय, विशेष शाखा, गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर गुन्हे अन्वेषण शाखा असे विभागही आयुक्तालयात आहेत. १० पोलीस उपायुक्त, २४ साहाय्यक पोलीस आयुक्त, ११८ पोलीस निरीक्षक, ३३६ साहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३ हजार ५४२ कर्मचारी असा फौजफाटा आयुक्तालयात आहे. पोलीस ठाण्यांशी नागरिकांचा थेट संबंध येतो. पारपत्र पडताळणी तसेच विविध तक्रारी नोंदविण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येतात. काही ठिकाणी नागरिकांना चांगली वागणूक मिळते तर, काही ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही. त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाही. काही पोलिसांच्या वागणुकीमुळे तक्रारदाराच्या मनात आरोपी असल्याची भावना निर्माण होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन नवे पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यता कक्ष पुन्हा सुरू केले आहेत. या कक्षाद्वारे आता त्यांनी सुस्त असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दट्ट्या देण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सहाय्यता कक्ष उभारण्यात आलेला आहे. पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद येथे केली जात आहे. त्यांचा संपर्क क्रमांकही घेतला जात आहे. हा क्रमांक नियंत्रण कक्षाकडे पाठविण्यात येतो. त्यापैकी कोणत्याही क्रमांकावर आयुक्त डुम्बरे यांच्यासह इतर अधिकारी संपर्क साधतात आणि त्यांना पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीचा आढावा घेतात. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली का, याचीही विचारणा करतात. नागरिकांना योग्य वागणूक मिळाली नसल्याचे आढळून येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करीत आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.