या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोर कोकणे/आशीष धनगर

ठाणे शहर पोलिसांचा गृह खात्याला प्रस्ताव :- ठाणे : ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या असून दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून गृह खात्याला पाठवण्यात आला आहे. सद्य:स्थितीत मुंब्रा पोलीस ठाण्यातून दिव्याचा कारभार हाकला जात आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे जिल्ह्यातील गुन्ह्य़ांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील शहरी भागात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्य़ातील शहर पोलिसांचे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर भागांत सध्या एकूण ३५ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी मुंब्रा पोलीस ठाण्याची हद्द मुंब्रा, कौसा, दिवा, आगासन, खार्डी, साबे आणि बेतावडे या भागापर्यंत आहे. या भागांमधील लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. तसेच मुंब्रा शहर हे संवेदनशील मानले जात असून तेथे दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील वाढता ताण लक्षात घेता ठाणे शहर पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या विभागणीचा निर्णय घेतला असून त्यापैकी दिवा, आगासन, खार्डी, बेतावडे आणि साबे गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आगासन येथे भूखंड आरक्षित असून त्या ठिकाणी दिवा पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्याच्या उभारणीचा प्रस्ताव राज्याच्या गृह खात्याला पाठवण्यात आला आहे. गृह खात्याच्या परवानगीनंतर लगेचच हे नवे दिवा पोलीस ठाणे उभारण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

पोलीस चौकीवर अधिक भार

सध्या दिवा परिसरात मुंब्रा पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस चौकी आहे. तसेच ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे कार्यालयही आहे. दिवा पोलीस चौकीत दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. दिवा आणि लगतच्या परिसरात दरवर्षी २०० हून अधिक गुन्ह्य़ांची नोंद होते. या गुन्ह्य़ांची नोंद करण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाणे गाठावे लागते. त्याचबरोबर दिवा चौकीत नेमणूक करण्यात आलेला अधिकारी आणि कर्मचारीवर्ग परिसराचे नियंत्रण करण्यासाठी अपुरा पडत असल्याचे दिसून आले.